Unlock: काही राज्यांत १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरू होणार; महाराष्ट्रात मात्र बंदी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 11:30 PM2020-10-12T23:30:29+5:302020-10-13T06:58:20+5:30
Coronavirus, Unlock Cinema Hall Reopening News: उत्तर प्रदेश, हिमाचलसह काही राज्यांत परवानगी, कोरोनाच्या साथीमुळे गेले सात महिने चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स बंदच असून, त्यामुळे मालकांना तोटा झाला आहे.
नवी दिल्ली : अनलॉकच्या पाचव्या टप्प्यांतर्गत येत्या गुरुवारी, १५ ऑक्टोबरपासून मल्टिप्लेक्स, तसेच चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आदी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी घेतला आहे, तर कोरोना साथ अजून न निवळल्याने महाराष्ट्र, राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये मात्र मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह यापुढेही बंदच राहणार आहेत.
१५ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देऊन चित्रपटगृह, तसेच मल्टिप्लेक्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आपापल्या राज्यातील व केंद्रशासित प्रदेशांतील स्थिती पाहून तेथील प्रशासनाला याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
जिथे मल्टिप्लेक्स व चित्रपटगृहे १५ ऑक्टोबरपासून उघडण्याची परवानगी देणारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये हरयाणा, पंजाब, गुजरात, मणिपूर, बिहार, गोवा, छत्तीसगढ, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, पुदुचेरी, चंदीगड यांचाही समावेश आहे, तर चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स अजून काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम या राज्यांनी घेतला आहे. बॉलिवूडचे चित्रपट खाली पिली, का पाई रणसिंघम हा तामिळ चित्रपट, स्पाय, फोर्स ऑफ नेचर, द सेंटल हे चित्रपट १५ ऑक्टोबर रोजी विविध चित्रपटगृहांत व मल्टिप्लेक्समध्ये झळकणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे गेले सात महिने चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स बंदच असून, त्यामुळे मालकांना तोटा झाला आहे.
प्रेक्षक क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांनाच मिळणार प्रवेश
मल्टिप्लेस, चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम घालून दिले आहेत. मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांच्या प्रेक्षक क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांनाच प्रवेश देण्यात यावा, तसेच एक सीट सोडून प्रेक्षकांना बसविण्यात यावे, प्रत्येक प्रेक्षकाने मास्क घालणे बंधनकारक आहे असे काही नियम लागू करण्यात आले आहेत. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्समध्ये वायूविजनची उत्तम सोय असणे, तसेच एअर कंडिशनरचे तापमान २३ अंश सेल्सियस ठेवावे, असेही निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.