दिल्ली विमानतळावर सापडली बेवारस बॅग; आरडीएक्सचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 06:24 AM2019-11-02T06:24:43+5:302019-11-02T06:25:01+5:30
प्रवाशांमध्ये घबराट
नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी मध्यरात्री एक बेवारस बॅग सापडली असून, त्यामध्ये आरडीएक्स असल्याचा संशय आहे. त्यामुळे प्रवाशांत घबराट निर्माण झाली असून, विमानतळावरील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.
या विमानतळाच्या टर्मिनल-३च्या प्रवेशद्वाराजवळ काळ्या रंगाची बेवारस बॅग सीआयएसएफच्या एका जवानाला आढळून आली. त्यानंतर या बॅगेची स्फोटकेशोधक यंत्राने, तसेच श्वानपथकाद्वारे तपासणी करून ती दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आली. या बॅगेत आरडीएक्स किंवा आयईडीही असावे, असा सुरक्षा यंत्रणांना कयास आहे. मात्र, याबाबत नेमकी माहिती शनिवारीच कळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. दिल्ली विमानतळावर बेवारस स्थितीत एक बॅग ठेवण्यात आली असल्याचा दूरध्वनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर आला. त्यानंतर सीआयएसएफ व दिल्ली पोलिसांनी वेगाने हालचाल करून टर्मिनल-३ येथून ही बॅग ताब्यात घेतली. त्या बॅगेतील स्फोटकांचीतज्ज्ञांच्या मदतीने तपासणी करण्यात आली.
विमानतळाची तपासणी
बेवारस बॅग सापडल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी काही काळ प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्यास मनाई केली होती. संपूर्ण विमानतळाची तपासणी करण्यात आल्यानंतरच शुक्रवारी पहाटे चारला प्रवाशांना विमानतळाबाहेर जाऊ देण्यात आले. या परिसरातील रस्त्यांवरही नाकाबंदी करण्यात आली होती.
दिल्ली विमानतळावर तीन टर्मिनल असून, त्यातील टर्मिनल-३ वरून आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा होते. प्रचंड सुरक्षा व्यवस्था असूनही टर्मिनल-३च्या प्रवेशद्वारापर्यंत ही बॅग कशी आणली गेली याचाही तपास पोलीस करीत आहेत.