सातफेरे होण्याआधीच नवरदेवाची वाईट सवय कळली अन् वधूचा लग्नास नकार, माघारी फिरली वरात!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 02:13 PM2022-12-15T14:13:26+5:302022-12-15T14:15:35+5:30
उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एका वधूनं नेमकं सातफेरे होण्याची वेळ असतानाच लग्न करण्यास नकार दिला.
उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एका वधूनं नेमकं सातफेरे होण्याची वेळ असतानाच लग्न करण्यास नकार दिला. तिची अनेकांनी समजून काढली तरीही ती काही लग्नाला तयार होईना. मग काय वऱ्हाडी मंडळी आणि नवरदेवाला रिकाम्या हातीच माघारी परतावं लागलं. उन्नाव जिल्ह्यातील परियार येथे बुधवारी रात्रीची घटना आहे. लग्नासाठी वरात कानपूरच्या परमपुरवा येथून आली होती. पण नवरदेवाची एक वाईट सवय वधूला भर मंडपात कळली आणि तिनं लग्नास नकार दिला. आता ही घटना सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे आणि याकडे व्यसनाविरोधातील मोठा संदेश म्हणून पाहिलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उन्नाव येथे लग्नासाठी एक वरात कानपूरहून आली होती. लग्नाचे सर्व विधी जवळपास झालेच होते. फक्त सातफेरे होणं बाकी होतं. यातच नवरदेवाला सिगारेट ओढण्याची तलप लागली आणि तो मंडपाबाहेर गेला. इतक्यातच वधूला हे कळलं आणि तिनं तातडीनं लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मग काय भर मंडपात वधू आणि वर पक्षाच्या कुटुंबीयांचा वाद सुरू झाला.
प्रकरण थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचले. पण वधू आपल्या निर्णयावर ठाम होती. कोणत्याही व्यसनाधीन व्यक्तीशी लग्न करणार नाही असं तिनं ठामपणे ठरवलं होतं. अखेर पोलिसांनी याप्रकरणात नवरदेवाच्या कुटुंबीयांची समजूत काढली आणि वधूच्या परवानगीविना तुम्ही लग्न करू शकत नाही हे पटवून दिलं. त्यानंतर वरात माघारी फिरली.
परियर चौकी पोलिसांनी दोन्ही पक्षांची बाजू समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. वधूने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नव्हती. यानंतर पोलिसांनी मध्यमार्ग काढत दोन्ही पक्षांना लग्नावर झालेला खर्च समसमान वाटप करण्याचा तोडगा काढला. त्यानंतर वरात माघारी फिरली. दोन्ही पक्षांनी झालेल्या खर्चाचं वाटप समसमान करण्याचं निश्चित केलं.