अरे देवा! ...अन् 2 क्विंटल जिलेबी, 1050 समोसे पोलिसांनी केले जप्त; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 08:28 AM2021-04-12T08:28:47+5:302021-04-12T08:31:22+5:30

Police Seized Samosa Snd Jalebi : पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 2 क्विंटल जिलेबी आणि 1050 समोसे जप्त केल्याची घटना समोर आली आहे.

unnao police seized samosa and jalebi which was made for voters in up | अरे देवा! ...अन् 2 क्विंटल जिलेबी, 1050 समोसे पोलिसांनी केले जप्त; 'हे' आहे कारण

अरे देवा! ...अन् 2 क्विंटल जिलेबी, 1050 समोसे पोलिसांनी केले जप्त; 'हे' आहे कारण

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून रुग्णांची संख्या तब्बल एक कोटीवर गेली आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं जात नसल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 2 क्विंटल जिलेबी आणि 1050 समोसे जप्त केल्याची घटना समोर आली आहे. तसेच या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

निवडणुकांचा रणसंग्राम अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याच दरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न हे हमखास केले जातात. लोकांनी आपल्या बाजूने मतदान करावं यासाठी नानाविध शक्कल लढवल्या जात आहेत. तर काही उमेदवार वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं देत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये देखील सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. उन्नावच्या एका ग्रामपंचायत निवडणुकीला उभ्या असलेल्या एका उमेदवाराने मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगळाच प्रयत्न केला. मात्र त्याचे ते प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार, उन्नावमधील एका उमेदवाराने मतदारांसाठी जिलेबी आणि समोसे वाटण्याचा बेत आखला होता. त्यासाठी जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. जिलेबी आणि समोसे तयार करण्यासाठी काही आचारी देखील बोलवण्यात आले होते. मात्र पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली आणि उमेदवाराचा सर्व प्लॅन फसला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तयार केलेली सर्व जिलेबी जप्त केली. जवळपास दोन क्विंटल आणि 1050 समोसे तयार होते. 

दहा जणांना अटक

पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेली जिलेबी आणि समोसे जप्त केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाने आचारसंहितेचं उल्लंघन आणि कोरोना नियमांचं उल्लंघन असल्याचं म्हणत ही कारवाई केली आहे. अनेक ठिकाणी निवडणुकीदरम्यान असे प्रकार होत असल्याचं पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पैसे तसेच भेटवस्तू वाटण्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: unnao police seized samosa and jalebi which was made for voters in up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.