सरकारच्या पहिल्या ६ महिन्यांत सुधारणांना अभूतपूर्व गती - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 06:33 AM2019-12-01T06:33:45+5:302019-12-01T06:33:58+5:30
बँकिंग क्षेत्राचे आरोग्य सुधारावे यासाठी बँकांचे महाविलीनीकरण सरकारने घोषित केले आहे.
नवी दिल्ली : आपल्या सरकारने सहा महिने पूर्ण केले असून, या काळात सरकारने सुधारणांना अभूतपूर्व गती दिली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी यांनी समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, घटनेतील कलम ३७० रद्द करण्यापासून ते आर्थिक सुधारणांपर्यंत, फलद्रूप सांसदीय कामकाजापासून ते निर्णायक विदेश नीतीपर्यंत अनेक ऐतिहासिक पावले आपल्या सरकारकडून उचलण्यात आली आहेत.
मोदी यांनी म्हटले की, आपल्या सरकारने ‘इंडस्ट्रीयल रिलेशन कोड’ला मंजुरी दिली, तसेच कॉर्पोरेट कर कमी करून २२ टक्क्यांवर आणला. नव्या देशांतर्गत मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी, तर १५ टक्केच कर केला. पाच सार्वजनिक उपक्रमांतील सरकारी हिस्सेदारी विकण्यास सरकारने मान्यता दिली आहे. यात प्रशासकीय नियंत्रणाचेही हस्तांतरण होणार आहे.
बँकिंग क्षेत्राचे आरोग्य सुधारावे यासाठी बँकांचे महाविलीनीकरण सरकारने घोषित केले आहे. याशिवाय २०१९-२० या वित्त वर्षासाठी बँकांत ७० हजार कोटी रुपये ओतण्यात आले आहेत. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनीही समाजमाध्यमांवर पोस्ट टाकून सरकारच्या कामगिरीचा गुणगौरव केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आपल्या सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत थेट अर्थसाह्य केले आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल, असे वचन भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. ते सरकारने पाळले आहे. या योजनेचा लाभ मिळणाºया शेतकºयांची संख्या १४.५ कोटी आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकºयांना वर्षाला ६ हजार रुपयांचे थेट अर्थसाह्य मिळत आहे.