ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 02:02 AM2020-02-24T02:02:19+5:302020-02-24T06:46:48+5:30

लष्करासह विविध दलांच्या जवानांवर जबाबदारी

Unprecedented security arrangements in Delhi in the wake of Trump's visit | ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

Next

नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत भेटीवर येत असून, ते दिल्लीतील मौर्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्यामुळे या हॉटेलसह परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच, ट्रम्प ज्या मार्गाने जाणार आहेत त्याची सुरक्षा यंंत्रणांकडून कसून तपासणी केली जात आहे. लष्करासह विविध दलांच्या जवानांवरही जबाबदारी देण्यात आली आहे.

भारतीय विविध सुरक्षा यंत्रणा या अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांसोबत काम करीत आहेत. ऊंच इमारतींवर एनएसजीचे ड्रोन विरोधी पथक, विशिष्ट कमांडो, पतंग पकडणारे पथक, श्वानांचे पथक, शार्प शूटर्स आदींना तैनात करण्यात आले आहे. हॉटेलकडे येणाऱ्या आणि जाणाºया रस्त्यांवर पराक्रम ही वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी सहा जिल्ह्यातील पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.त्याशिवाय केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवळपास ४० तुकड्याही रुजू झाल्या आहेत. सरदार पटेल मार्गावर रात्रीच्या वेळीही स्पष्ट दिसू शकेल अशा उच्चक्षमतेचे शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. २४ तास त्याची निगराणी केली जाणार आहे. याच मार्गावर हे हॉटेल आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी अधिक खबरदारी घेण्याचे काम सुरू केले आहे. हल्लाविरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे. विविध स्तरावरील ही व्यवस्था असून ज्या रस्त्यावरुन ट्रम्प जाणार आहेत त्याच्या दुतर्फा बॅरिकेडसच्या दोन रांगा तैनात करण्यात आल्या आहेत.

एक कोटी खर्च
पाच वर्षांपूर्वी जेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आले होते त्यावेळी दिल्ली पोलिसांनी ६०५ सीसीटीव्ही कॅमेरे भाड्याने आणून लावले होते. त्यासाठी तब्बल एक कोटी रुपये एवढा खर्च आला होता.

शाळा मार्गावर नजर
दिल्ली सरकारही विविध संस्थांच्या माध्यमातून काम करीत आहे. डोनाल्ड यांच्या पत्नी मेलानिया या दिल्लीतील शाळेला भेट देणार असल्याने त्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या निर्देशानुसार रस्त्यातील झाडांची तोड करण्यात आली आहे. ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलीस हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांबाबत बैठकही झाली आहे.

हॉटेलला वेढा : हॉटेलच्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा असणार आहे. दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस सोबत अंतर्गत सुरक्षेचा जबाबदारी सांभाळत आहेत. तर, हॉटेलची लॉबी, पार्किंग, लॉन, पूल हा दुसरा स्तर आहे. आणि तिसऱ्या टप्प्यात जिल्हा पोलीस आहेत. हॉटेलसमोर मोठी हिरवी जमीन आहे. तेथेही सुरक्षारक्षक राहणार आहेत. शेजारच्या ताज पॅलेस हॉटेलमध्येही सुरक्षारक्षक राहतील. ज्या सूटमध्ये ट्रम्प राहणार आहेत. तेथे हॉटेलच्या बहुतांश कर्मचाऱ्यांना जाण्यास परवानगी राहणार नाही. गेल्या दोन आठवड्यापासून हॉटेलच्या ठिकाणी बंदोबस्त आहे. एनएसजी कमांडो, दिल्ली पोलीस हे नियमितपणे विविध इमारतींच्या गच्चीवर पहारा देत आहेत. अमेरिकन दूतावासाचे अधिकारीही या सर्व तयारीवर नजर ठेवून आहेत. ट्रम्प ज्यावेळी हॉटेलमध्ये राहतील त्यावेळी अन्य ग्राहकांसाठी हॉटेल त्यावेळी बंद असेल. या हॉटेलमधील सर्वच्या सर्व ४३८ खोल्या दौºयासाठी बुक करण्यात आल्या आहेत.

Web Title: Unprecedented security arrangements in Delhi in the wake of Trump's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.