काश्मीर खोऱ्यात अभूतपूर्व सुरक्षा
By admin | Published: February 10, 2017 01:14 AM2017-02-10T01:14:13+5:302017-02-10T01:14:13+5:30
संसदेवरील हल्लाप्रकरणातील अफजल गुरू याच्या फाशीला चार वर्ष झाल्यानिमित्त फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केल्याच्या द्दृष्टीकोनातून गुरुवारी खोऱ्यातील सुरक्षा
श्रीनगर : संसदेवरील हल्लाप्रकरणातील अफजल गुरू याच्या फाशीला चार वर्ष झाल्यानिमित्त फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केल्याच्या द्दृष्टीकोनातून गुरुवारी खोऱ्यातील सुरक्षा
व्यवस्था वाढविण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने श्रीनगर आणि शोपियाँच्या काही भागात निर्बंध लागू केले आहेत. संसदेवरील हल्ल्यात दोषी आढळल्यामुळे अफजल गुरूला फाशी देण्यात आली होती.
शोपियॉं शहरासह श्रीनगरच्या ६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्बंध लागू करण्यात आले आहेत, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. शोपियॉं शहर, श्रीनगरमधील नौहट्टा, खानयार, रैनवारी, सफाकदाल आणि महाराजगंज पोलिस ठाण्याची हद्द तसेच मैसुमा भागात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत, असे हा अधिकारी म्हणाला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. निदर्शने उधळून लावण्यासाठी शहरातील संवेदनशिल भागात तसेच खोऱ्यात इतरत्र पुरेशा प्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. हुरियत कॉन्फरन्सचे दोन्ही गट, जेकेएलएफसह सर्व फुटीरवादी गटांनी गुरूच्या फाशीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमुळे खोऱ्यातील जनजिवन आज विस्कळीत झाले. खोऱ्यातील बहुतांश दुकाने, पेट्रोलपंप आणि दुकाने आज बंद होती.
सार्वजनिक परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली असली तरी खासगी कार, कॅब्स आणि अॅटोरिक्षा नेहमीप्रमाणे रस्त्यावर धावत होत्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने बारामुल्ला-बनिहाल रेल्वेसेवा आज बंद ठेवली. गुरूला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी फाशी देऊन तिहार तुरुंगात दफन करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)