गडकरींच्या राजीनाम्यावरून अभूतपूर्व गदारोळ

By admin | Published: May 11, 2015 11:46 PM2015-05-11T23:46:59+5:302015-05-11T23:46:59+5:30

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अडून बसलेल्या काँग्रेसने सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडले

An unprecedented throng from Gadkari's resignation | गडकरींच्या राजीनाम्यावरून अभूतपूर्व गदारोळ

गडकरींच्या राजीनाम्यावरून अभूतपूर्व गदारोळ

Next

नवी दिल्ली : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अडून बसलेल्या काँग्रेसने सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडले. ४ वाजेपर्यंत या सभागृहाचे कामकाज तब्बल आठ वेळा तहकूब करण्यात आले, हे विशेष.
गडकरी यांच्या पूर्ती समूहाला कर्ज देताना अनियमितता घडवून आणल्याचा ठपका नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या (कॅग) अहवालात ठेवण्यात आल्याचा मुद्दा काँग्रेसने जोरदारपणे लावून धरला. दरम्यान, गडकरी यांनी कॅगच्या अहवालावर मौन तोडत आरोप फेटाळले आहेत. कॅगच्या अहवालात माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नसताना हेतुपुरस्सर राजकीय कारणांवरून वाद निर्माण करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. राज्यसभेत लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोमवारी कॅगच्या अहवालावर विरोधकांनी गडकरींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यामुळे वारंवार कामकाजाचा खोळंबा झाला. शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तासही वाया गेला. भोजन अवकाशापूर्वी सभागृहाचे कामकाज पाच वेळा रोखण्याचा विक्रम घडला. ३ वाजेपर्यंत सात वेळा कामकाज तहकूब करण्यात आल्यानंतर आठव्यांदा कामकाज सुरू झाले, त्यावेळीही काँग्रेसचे सदस्य आक्रमक बनले होते. त्यांनी हौदात धाव घेत नारेबाजी चालूच ठेवली. काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी कॅगचा अहवाल हाती फडकवत लक्ष वेधले. बसपाचे नरेश अग्रवाल यांनी मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र गदारोळात ते शक्य झाले नाही. गडकरी यांनी निवेदनात आरोप फेटाळून लावले. मात्र समाधान न झालेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्याने अखेर संध्याकाळी ४ वाजता कामकाज पूर्णपणे थांबविण्यात आले. सकाळी काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी कॅगच्या अहवालाचा मुद्दा उपस्थित केला. पूर्ती या गडकरींच्या कंपनीत अनियमितता असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. कोणताही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केल्याचे पाहता गडकरींनी राजीनामा द्यावा. त्यावर संसदीय कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी गडकरींवरील आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: An unprecedented throng from Gadkari's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.