कृषी विधेयकांवरून राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 06:55 AM2020-09-21T06:55:26+5:302020-09-21T06:55:41+5:30
उपसभापतींनी फेटाळताच तृणमूलचे डेरेक ओब्रायन हे उपसभापतींच्या खुर्चीकडे धावून गेले व तेथील नियम पुस्तिका सभापतींच्या चेहऱ्याकडे फेकली. मात्र मार्शलने ती मध्येच रोखली. द्रमुकचे तिरूची शिवा हेही डेरेक यांच्याबरोबर होते. त्यांनी व इतरांनी कागदपत्रे फाडून हवेत फेकली.
नवी दिल्ली : राज्यसभेत रविवारी प्रचंड रणकंदन झाले. कृषी विधेयकांवरून विरोधकांनी माइक तोडला, कागदपत्रे फाडली, धक्काबुक्की केली. मात्र, या विरोधाला न जुमानता सरकारने प्रचंड गदारोळातच विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करून घेतली. आजच्या प्रकारावर संतप्त झालेल्या विरोधकांनी उपसभापतींवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला, तर गदारोळ करणारांवर कारवाई करण्याचा विचार सुरू असल्याचे सभापतींनी म्हटले आहे.
शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, २०२० आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक, २०२० ही वादग्रस्त ठरलेली दोन कृषी विधेयके राज्यसभेत रविवारी गदारोळात मंजूर करण्यात आली. या वर्षी ५ जून रोजी जारी केलेल्या दोन अध्यादेशांची जागा आता या विधेयकांनी घेतली आहे.
ही विधेयके संमत होत असताना सभागृहात खूप गोंधळाचे वातावरण होते. कारण, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी टेबलवरील कागदपत्रे हिसकावून घेतली व सभापतींचा मायक्रोफोन तोडून टाकला. विरोधी पक्ष विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची मागणी करत होते, तेव्हा उपसभापती हरिवंश यांनी विधेयके संमत होण्यासाठी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवून घेण्यासाठी सदस्यांची संमती मागितली आणि गदारोळ सुरू झाला. विरोधी सदस्यांनी सभागृह वेळापत्रकानुसार तहकूब करण्याची मागणी केली. तथापि, हरिवंश यांनी कामकाज सुरूच ठेवले. त्यांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना विधेयकांवरील चर्चेला तुमचे उत्तर देणे सुरूच ठेवा, असे सांगितले. यावर विरोधकांनी जोरदार विरोध सुरु केला.
ही विधेयके सभागृहाच्या समितीकडे पाठवण्याचा चार विरोधी पक्षांचा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. मात्र, यावर मतदान घेण्याची मागणी काँग्रेस, तृणमूल, माकपा, द्रमुक सदस्यांनी केली. ती उपसभापतींनी फेटाळताच तृणमूलचे डेरेक ओब्रायन हे उपसभापतींच्या खुर्चीकडे धावून गेले व तेथील नियम पुस्तिका सभापतींच्या चेहऱ्याकडे फेकली. मात्र मार्शलने ती मध्येच रोखली. द्रमुकचे तिरूची शिवा हेही डेरेक यांच्याबरोबर होते. त्यांनी व इतरांनी कागदपत्रे फाडून हवेत फेकली.
उपसभापती हरिवंश यांनी सदस्यांना आपापल्या जागेवर जाण्याचे व कोरोनाची नियमावली पाळण्याचे आवाहन केले. तरीही गदारोळ चालूच राहिला. त्यामुळे सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सभागृह पुन्हा सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणा दिल्या. तरीही हरिवंश यानी विधेयके आवाजी मतदानासाठी ठेवली. एक विधेयक मंजूर होताच विरोधी सदस्यांनी राज्यसभा अधिकाऱ्यांच्या टेबलवर चढण्याचा प्रयत्न केला. नंतर दुसरेही विधेयक मंजूर झाले व विरोधकांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले.
उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव
राज्यसभेत रविवारी झालेल्या कामकाजावर प्रचंड संतप्त झालेल्या १२ विरोधी पक्षांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. वरिष्ठ सभागृहात ज्या पद्धतीने रविवारी दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली, त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
गदारोळ करणाºयांवर कारवाईचा विचार
राज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू हे कमालीचे नाराज असल्याचे समजते. गदारोळ करणाºयांवर कारवाई करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पुन्हा एकदा सांगतो, एमएसपी व्यवस्था कायम राहील. सरकारी खरेदी कायम राहील. आम्ही इथे शेतकºयांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य होईल तितके प्रयत्न करू.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणत आहे. कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकºयांविरोधात मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते