झारखंड भाजपामध्ये अस्वस्थता
By admin | Published: July 5, 2016 04:24 AM2016-07-05T04:24:47+5:302016-07-05T04:24:47+5:30
झारखंड प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ताला मरांडी यांच्या मुलाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता असून, त्यांनी अध्यक्षपदाचा
- एस. पी. सिन्हा, रांची
झारखंड प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ताला मरांडी यांच्या मुलाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता असून, त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे पक्षाचे नेतेच खासगीत बोलत आहेत. अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा मुन्नाअटक टाळण्यासाठी पळून गेला असून, पोलीस त्याचा शोधत आहेत.
दुसरीकडे ती मुलगी अल्पवयीन नाही, असा दावा ताला मरांडी आणि खासदार निशिकांत दुबे यांनी केला असून, त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली जावी, अशी मागणी दोघांनी केली आहे. आपण आदिवासी समाजातील, आमच्या रीतीरिवाजानुसारच हा विवाह झाला असल्याचे ताला मरांडी यांनी सांगितले. ताला मरांडी यांना भाजपाने प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे घाबरलेल्या झारखंड मुक्ती मोर्च्याच्या नेत्यांनी कुभांड रचले आहे, असा आरोप खा. दुबे यांनी केला आहे. मात्र खा. दुबे यांच्याखेरीज भाजपाचा एकही नेता मरांडी यांच्या बाजूने बोलण्यास तयार नाही. किंबहुना त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असेच मत भाजपा नेते खासगीत व्यक्त करीत आहेत.
आमची फजिती झाली
पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या प्रकरणाची सर्व माहिती मागवून घेतली आहे. आमची या प्रकरणात फजिती झाली आहे, हे उघड आहे आणि विरोधी पक्ष ज्या पद्धतीने भाजपावर हल्ले चढवत आहे, आक्रमक होत आहे, ते पाहता लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे, असे एका नेत्याने बोलून दाखवले.