अवकाळी पावसाचे थैमान, वीज पडून ११ जणांचा मृत्यू; मध्य प्रदेश-महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 09:12 AM2024-05-13T09:12:31+5:302024-05-13T09:12:51+5:30
राजस्थानात पावसामुळे दिलासा.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहारमध्ये गेल्या २४ तासांत वीज पडून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुढील १-२ दिवस आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर दुसरीकडे, देशातील काही राज्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे.
चांगल्या मान्सूनचे मिळाले संकेत
राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणामध्ये तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत नोंदवले जात आहे. शनिवारी महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चांगल्या मान्सूनची चिन्हे आता हळूहळू मजबूत होत आहेत. चांगल्या पावसासाठी आवश्यक असलेले बदल पॅसिफिक आणि हिंद महासागरात दिसू लागले आहेत. हे मान्सूनसाठी चांगले संकेत आहेत.
राजस्थानमध्ये पावसाने दिला नागरिकांना दिलासा
जयपूर : हवामान बदलाच्या प्रभावामुळे राजस्थानच्या काही भागात गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे, अशी माहिती जयपूर हवामान केंद्राने दिली. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भयंकर उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील बहुतांश भागातील नागरिकांना प्रचंड दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत देवगड, (जि. राजसमंद) येथे सर्वाधिक ४२ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच राज्यात दि. १४ मे पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे बहुतांश भागातील पारा ४२ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे.