दुग्धाभिषेकाद्वारे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण विलंब होत असल्याने क्रांती दल संघटनेचा निर्णय : काही क्षणात कापडाने झाकला पोलिसांनी पुतळा
By admin | Published: January 14, 2016 11:59 PM2016-01-14T23:59:28+5:302016-01-15T00:13:16+5:30
महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी होत असलेल्या विलंबामुळे महाराणा प्रताप क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुग्धाभिषेक करीत पुतळ्याचे अनावरण केले.
जळगाव : बहिणाबाई उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी होत असलेल्या विलंबामुळे महाराणा प्रताप क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुग्धाभिषेक करीत पुतळ्याचे अनावरण केले. काही वेळेनंतर पोलिसांनी पुतळ्याला पुन्हा झाकल्याने वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहेत.
बहिणाबाई उद्यान परिसरात क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा तयार करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा पुतळा काळ्या कापडाने झाकलेला आहे. पुतळा अनावरणाच्या शुभारंभासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणदेखील महाराणा प्रताप पुतळा समितीतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार १७ जानेवारी रोजी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले होते.
दुग्धाभिषेक व पूजन करीत केले अनावरण
१७ रोजी पुतळ्याचे अनावरण होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने क्रांती दल संघटनेचे तीन ते चार कार्यकर्ते गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पुतळ्याच्या ठिकाणी जमले. सुरुवातीला पुतळ्याभोवती गुंडाळलेला कापड कार्यकर्त्यांनी हटविला. त्यानंतर पुतळा पाण्याने स्वच्छ करीत त्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर सचिन राजपूत व सहकार्यांनी पुतळ्याचे पूजन करीत पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप यांच्या नावाने जयघोष केला.
जिल्हापेठ पोलीस दाखल
महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी कापडाने पुतळ्याला पुन्हा झाकले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत पुतळा अनावरणाबाबत माहितीदेखील घेतली. त्यानंतर कार्यकर्ते आपल्या घराकडे रवाना झाले.