UP Assembly Election 2022: योगींच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचं घणाघाती भाषण, म्हणाले 'उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 03:14 PM2022-02-24T15:14:59+5:302022-02-24T15:17:43+5:30
UP Assembly Election 2022 : आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांचा बालेकिल्ला असलेल्या ऊत्तर प्रदेशमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख Aditya Thackeray यांनी झंझावाती सभा घेतली.
लखनौ - केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधातशिवसेना कमालीची आक्रमक झालेली आहे. त्यातच आता जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे अशा ठिकाणी शिवसेनेकडून भाजपाला आव्हान देण्याची रणनीती आखली जात आहे. काही दिवसांपूर्वीच दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केल्यानंतर शिवसेनेने गोव्यातही भाजपाच्या सत्तेला आव्हान दिले होते. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमध्येही भाजपाविरोधात शिवसेनेने दंड थोपटले आहेत. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज येथे शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी झंझावाती सभा घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात घणाघाती भाषण करत उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असा विश्वास व्यक्त केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, उत्तर प्रदेशात परिवर्तनाची लाट आहे. उत्तर प्रदेशात यावेळी सत्ताबदल होणार आहे. ज्या आशेने भाजपाला सत्ता दिली होती. त्या अपेक्षांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता राज्यात परिवर्तन झाले पाहिजे. मोठे बहुमत असूनही भाजपाला जनतेच्या स्वप्नांची पूर्तता होऊ शकली नाही. पाच वर्षांत केवळ दंग्याचीच चर्चा झाली. भाजपाने केवळ घाबरवण्याची भाषा केली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
आज उत्तर प्रदेश में डुमरियागंज विधानसभा के प्रत्याशी शैलेंद्र उर्फ राजू श्रीवास्तव जी के समर्थन मे जनसभा को संबोधित किया। यहा श्रीवास्तव जी को आशीर्वाद देने आया हुआ जनसैलाब देखकर बदलाव की लहरे साफ़ दिखती है।@ShivSena@rautsanjay61 जी @priyankac19 जी @mpdhairyasheel जी pic.twitter.com/54LtaJuZM1
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 24, 2022
शिवसेनेचे राजकारण पाहा. राजकारण करा तेव्हा ते लोकांसाठी करा, समाजसेवेसाठी करा, अशी शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाच्या रंगाचा रंग लाल आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. त्यावेळी आम्ही सत्तेत होतो, याचं दु:ख वाटतं, अशी खंतही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.
उत्तर प्रदेशमधील सध्याचे मुख्यमंत्री जे काही दिवसांनी माजी मुख्यमंत्री बनतील. ते मुंबईत आले की मोठमोठ्या जाहिराती देतात. एवढी गुंतवणूक आली, एवढा विकास झाला, एवढे रस्ते बनले, असे दावे करतात. मात्र रोजगार वाढले आहेत की बेरोजगारी वाढली वाढली आहे, महिलांचा सन्मान वाढलाय की अन्याय वाढलाय, हेच आम्हाला बदलायचं आहे. त्यामुळेच परिवर्तनाची लाट येथे आली पाहिजे, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.