UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपा पुन्हा एकदा ३२५ जागा जिंकणार, सातव्या टप्प्यातील मतदानाआधी योगी आदित्यनाथ यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 10:27 PM2022-03-06T22:27:06+5:302022-03-06T22:27:50+5:30
UP Assembly Election 2022: सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांनी मोठे विधान केले आहे. उत्तर प्रदेशात यावेळी ८० आणि २० मधील लढाई आहे. तसेच BJP यावेळीही ३२५ जागा जिंकण्याचे लक्ष्य पार करून मोठ्या बहुमतासह सरकार स्थापन करेल, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये यावेळी होत असलेली विधानसभेची निवडणूक कमालीची अटीतटीची होत आहे. गेल्यावेळी एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भाजपाची अखिलेश यादव यांच्या झंझावाती प्रचारासमोर दमछाक होत आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशात सत्तापरिवर्तन होणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे विधान केले आहे. उत्तर प्रदेशात यावेळी ८० आणि २० मधील लढाई आहे. तसेच भाजपा यावेळीही ३२५ जागा जिंकण्याचे लक्ष्य पार करून मोठ्या बहुमतासह सरकार स्थापन करेल, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी न्यूज १८ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे विधान केले. उत्तर प्रदेशात भाजपाला बहुमत मिळाले नाही तर काय करणार, अशी विचारणा केली असता योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये जर तरचा विषयच नाही आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, ८० आणि २० असे विभाजन होणार आहे. भाजपा निर्विवाद बहुमतासह सरकार स्थापन करेल. ८० टक्क्यांसह भाजपा ३२५ जागा जिंकेल. पहिल्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यापर्यंत भाजपाच्या बाजूने वातावरण राहिले. आता सातव्या टप्प्यात संपूर्ण समर्थन मिळेल.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशात एक मुख्यमंत्री दुसऱ्यांदा सत्तेवर येत नाही, या मिथकाबाबत योगी म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये भाजपा पुन्हा सरकार स्थापन करेल. तसेच उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री न बनण्याचे मिथकही तोडेल. तसेच सपाकडून मठामध्ये पाठवण्याच्या करण्यात येत असलेल्या दाव्यांवर योगी आदित्यनाथ म्हणाले की, मी तर मठामध्ये राहणारा माणूस आहे. हे लोककल्याणाचे काम आहे. अशाप्रकारचे दावे विरोधी पक्षाची निराशा प्रदर्शित करतात. मी तर गोरखपूर येत जात असतो. अखिलेश यादवच निवडणुकीनंतर परदेशात जाण्यासाठीते तिकीट बुक केले आहे.