UP Assembly Election 2022: ‘उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसणार, अखिलेश यादव १७५ जागा जिंकणार’, संजय राऊतांना सांगितला आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 10:34 PM2022-03-09T22:34:42+5:302022-03-09T22:35:29+5:30
UP Assembly Election 2022 Result : उत्तर प्रदेशात आखिलेश यादव आणि त्यांची आघाडी भाजपाला कडवी टक्कर देताहेत. कुठल्याही परिस्थितीत अखिलेश यादव आणि त्यांची आघाडी १७५ जागांचा टप्पा पार करणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई - पुढच्या काही तासांमध्ये देशातील पाच विधानसभांच्या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशच्या निकालांकडे सर्वांचे अधिक लक्ष लागले आहे. दरम्यान, एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाला बहुमत मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील निकांलांबाबत वेगळं मत व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशात आखिलेश यादव आणि त्यांची आघाडी भाजपाला कडवी टक्कर देताहेत. कुठल्याही परिस्थितीत अखिलेश यादव आणि त्यांची आघाडी १७५ जागांचा टप्पा पार करणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, निवडणूक काळात मी अनेक राज्यांत जाऊन आलो आहे. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूरमध्ये आमचे उमेदवार निवडणुका लढताहेत. दरम्यान, एक्झिट पोल किती चुकीचे ठरतात हे गेल्या अनेक वर्षांत दिसून आले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरणार भाजपाचा मुख्यमंत्री होणार असे सर्व्हे सांगत होते. प्रत्यक्षात ममता बॅनर्जी आधीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी झाल्या. पाच वर्षांपूर्वी पंजाबमध्ये काँग्रेसला कुठलेही स्थान सर्व्हे देत नव्हते. आपचं राज्य येणार असं सांगत होते. प्रत्यक्षात काय झालं तो इतिहास आहे.
आता उत्तर प्रदेशचं बोलायचं झालं तर उत्तर प्रदेश मोठं राज्य आहे, हे ठीक आहे.. उत्तर प्रदेशमधील सर्वेही मी पाहिलेत. पण मला अजूनही वाटतं की जे आकडे मी पाहतोय, तसे निकाल लागणार नाही. आखिलेश यादव आणि त्यांची आघाडी भाजपाला कडवी टक्कर देताहेत. कुठल्याही परिस्थितीत अखिलेश यादव आणि त्यांची आघाडी १७५ जागांचा टप्पा पार करणार हे नक्की आहे. भाजपाच्या सव्वाशे जागा कमी होताहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. मणिपूरचं पाहावं लागेल. गोव्यात त्रिशंकू विधानसभा येईल. एकंदरीत उद्याचं चित्र उद्याच पाहता येईल. लोकांचा सर्व्हे पोलवर विश्वास राहिलेला नाही. देशात मोदींची राज्य आल्यापासून प्रत्येक पोल हा मॅनेज असतो, त्यांना सोईचा असतो, असं लोकांचं मत झालेलं आहे तसंच दिसतंय, असे संजय राऊत म्हणाले.