UP Assembly Election 2022: पतीसोबत मतभेद, पक्षानं नाकारलं तिकीट, आता भाजपाला सोडचिठ्ठी देऊन सपात प्रवेश करणार? स्वाती सिंह यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:27 PM2022-02-02T15:27:33+5:302022-02-02T15:28:16+5:30
UP Assembly Election 2022: मंत्री पत्नी स्वाती सिंह आणि पक्षातील प्रमुख नेता असलेला पती दयाशंकर सिंह या दोघांनीही एकाच मतदारसंघात उमेदवारीसाठी दावा केल्याने उत्तर प्रदेशमध्ये भाजपासमोर पेच निर्माण झाला होता. दरम्यान, या ठिकाणी पती आणि पत्नी या दोघांचीही दावेदारी फेटाळून लावत पक्षाने तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट दिले.
लखनौ - मंत्री पत्नी स्वाती सिंह आणि पक्षातील प्रमुख नेता असलेला पती दयाशंकर सिंह या दोघांनीही एकाच मतदारसंघात उमेदवारीसाठी दावा केल्याने उत्तर प्रदेशमध्ये भाजपासमोर पेच निर्माण झाला होता. दरम्यान, या ठिकाणी पती आणि पत्नी या दोघांचीही दावेदारी फेटाळून लावत पक्षाने तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट दिले. दरम्यान, स्वाती सिंह यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्या भाजपा सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या चर्चांना स्वाती सिंह यांनी पूर्णविराम दिला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी समाजवादी पक्षात जणारा असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच माझ्या कणाकणात भाजपा आहे. मी याच पक्षात आहे, राहीन आणि याच पक्षात मरेन, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पती दयाशंकर सिंह यांच्यासोबत सुरू असलेला विवाद आणि पक्षाकडून नाकारण्यात लेल्या उमेदवारीबाबत स्पष्ट करताना सांगितले की, माझे माझ्या पतींसोबत कुठलेही मतभेद नाही आहेत. मी भाजपामध्ये आहे. हा तो पक्ष आहे जो कधी चुकीचा निर्णय देत नाही. मी भाजपाच्या कुटुंबाचा भाग आहे आणि यापुढेही राहीन. मी वयाच्या १७ व्या वर्षी विद्यार्थी परिषदेत प्रवेश केला होता. माझ्या कणाकणात भाजपा आहे. मी इथेच आहे. इथेच राहीन आणि याच पक्षात मरेन.
स्वाती सिंह यांनी लखनौमधील सरोजिनीनगर येथून पक्षाकडे तिकीट मागितले होते. याच मतदारसंघातून त्यांचे पती दयाशंकर सिंह यांनी उमेदवारी मागितली होती. त्यामुळे भाजपाने हे कौटुंबिक भांडण सोडवण्यासाठी ईडीचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांनी लखनौच्या सरोजिनीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.