UP Assembly Election 2022: पत्नी स्वाती सिंह यांचे तिकीट भाजपाने कापल्याने पती दयाशंकर सिंह यांनी व्यक्त केला आनंद, दिली अशी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 12:45 PM2022-02-02T12:45:49+5:302022-02-02T12:46:21+5:30
UP Assembly Election 2022: भारतीय जनता पक्षाने लखनौमधील सरोजिनीनगर सीटवरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढला आहे. या जागेसाठी आमने सामने आलेले भाजपा नेते दयाशंकर सिंह आणि त्यांच्या पत्नी स्वाती सिंह या दोघांनाही तिकीट नाकारत तिसऱ्याच व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनौ - भारतीय जनता पक्षाने लखनौमधील सरोजिनीनगर सीटवरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढला आहे. या जागेसाठी आमने सामने आलेले भाजपा नेते दयाशंकर सिंह आणि त्यांच्या पत्नी स्वाती सिंह या दोघांनाही तिकीट नाकारत तिसऱ्याच व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपान सरोजिनीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, राजेश्वर सिंह यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दयाशंकर सिंह यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, राजेश्वर सिंह यांना विजयी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. दयाशंकर सिंह यांनी सांगितले की, राजेश्वर सिंह हेसुद्धा बलियामधील आहेत. मीपण तिथलाच आहे. त्यामुळे आम्हा दोघांमध्ये कौटुंबिक संबंध आहेत.
दरम्यान, कौटुंबिक मतभेदांमुळे तिकीट कापले गेल्याची बाब दयाशंकर सिंह यांनी फेटाळली आहे. आम्हा पती-पत्नीमधील भांडणामुळे राजेश्वर सिंह यांना उमेदवारी देण्यात आले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, पक्ष जो विजय मिळवून देऊ शकतो, असे वाटते त्याला तिकीट दिले जाते. राजेश्वर सिंह यांना तिकीट देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाने आमच्यासाठीही काहीतरी चांगला निर्णय घेतला असेल. या निवडणुकीत अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांची तिकीटं कापण्यात आली आहेत, त्यामुळे त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही, असंही दयाशंकर सिंह म्हणाले.
तत्पूर्वी दयाशंकर सिंह यांच्या पत्नी आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वाती सिंह यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्या एका व्यक्तीसोबत बोलताना आपली व्यथा मांडताना ऐकू येत होत्या. तसेच या संभाषणामध्ये त्यांनी पती दयाशंकर सिंह यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. स्वाती सिंह यांचे म्हणणे ऐकल्यावर समोरील व्यक्ती स्वाती सिंह यांच्याप्रति सहानुभूती व्यक्त करताना दिसतो. तो सांगतो की तुम्ही स्वत:च्या बळावर राजकीय कारकीर्द घडवली आहे. त्यात पतीचं काहीही योगदान नाही. दरम्यान, लखनौमधील सरोजिनीनगर मतरादसंघामधून मंत्री स्वाती सिंह यांच्यासह त्यांचे पती दयाशंकर सिंह यांनीही दावेदारी केली होती. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यावी याबबत पक्षासमोर पेच निर्माण झाला होता.