UP Assembly Election 2022 : 'मुझे हेमा मालिनी नहीं बनना है', जयंत चौधरी असे का बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 12:57 PM2022-02-02T12:57:09+5:302022-02-02T12:58:45+5:30
Jayant Chaudhary : राष्ट्रीय लोक दलाचे (RLD) अध्यक्ष जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांच्या एका विधानाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
मथुरा : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. तसेच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. यातच राष्ट्रीय लोक दलाचे (RLD) अध्यक्ष जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांच्या एका विधानाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. मला हेमा मालिनी (Hema Malini) बनायचे नाही, असे विधान जयंत चौधरी यांनी केले आहे. जयंत चौधरी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे आरएलडी उमेदवार योगेश नोहवार यांच्या प्रचारासाठी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
जयंत चौधरी म्हणाले, "योगेश एवढेच सांगत होते की, अमित शाह यांनी त्यांना 'आ जा तेरा हेमा मालिनी बनाना दूंगा' असे सांगितले आहे. तुम्ही कशाबद्दल बोलत आहात हे माहीत नाही? आमच्यासाठी काही प्रेम नाही, आसक्ती नाही... आणि मी म्हणतोय मला काय मिळेल? मला हेमा मालिनी व्हायचे नाही. जनतेसाठी तुम्ही काय करणार? त्या सात शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी तुम्ही काय केले? टेनी मंत्रीपदी का बसले आहेत? सकाळी उठल्याबरोबर ते द्वेष विरघळवण्याचे काम सुरू करतात. त्यांच्याजवळ काम नाही."
#WATCH | ...I don't want to be Hema Malini, what will you get by pleasing me?...What have they (BJP) done for the families of 7 farmers, why is (Ajay Mishra) Teni a minister?: RLD chief Jayant Chaudhary in Mathura (1.02) pic.twitter.com/qsc5liHlC4
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 2, 2022
योगेश नौहवार यांना मांट जागेवरून उमेदवारी
राष्ट्रीय लोकदलाने (RLD) योगेश नौहवार यांना मथुराच्या मांट विधानसभेच्या जागेवरून उमेदवारी दिली आहे. जयंत चौधरी यांनी आपल्या भाषणादरम्यान अमित शाह आणि योगेश नौहवार यांच्यातील कथित संभाषणाची माहिती दिली.
पश्चिम उत्तर प्रदेशात कोण बाजी मारणार?
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत जयंत चौधरी यांचा पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने युती केली आहे. जयंत चौधरी आरएलडी आणि समाजवादी पार्टी युतीच्या विजयाचा दावा करत आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपा आणि आरएलडी-समाजवादी पार्टी युतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
सात टप्प्यात विधानसभा निवडणूक
दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.