UP Assembly Election 2022: ‘द्यायचं होतं सायकलला मत, अधिकाऱ्यांनी कमळासमोर मारला शिक्का’, दिव्यांगाच्या आरोपानंतर उत्तर प्रदेशात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 03:04 PM2022-02-07T15:04:33+5:302022-02-07T15:06:58+5:30
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आल्याने राज्यातील राजकीयपारा चढला आहे. दरम्यान, राज्यात पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून होत असलेले मतदान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आल्याने राज्यातील राजकीयपारा चढला आहे. दरम्यान, राज्यात पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून होत असलेले मतदान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आग्रामधील फतेहाबाद येथील पोस्टल मतदानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी मनमानीपणे मतदान करवून घेतल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी यावर कारवाई होण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अखिलेश यादव यांनी आज आग्रामधील फतेहाबाद विधानसभेतील दिव्यांग आणि वृद्धांच्या मतदानाबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अखिलेश यादव म्हणाले की, बॅलेटच्या माध्यमातून मत देण्यामध्ये झालेल्या गडबडीप्रकरणी एक अधिकारी म्हणतो की, ‘एका मताने काय होतंय?’ ही बाब खूप गंभीर आहे. निवडणूक आयोगाने अशा अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.
वृद्धों और दिव्यांगों से वोट डलवाने में धांधली के मामले में फतेहाबाद विधानसभा में पोलिंग पार्टी पर, मतदाता की इच्छा के विरूद्ध, ख़ुद ही मनमाना वोट डालने का गंभीर आरोप लगा है।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 7, 2022
चुनाव आयोग तत्काल कार्रवाई करे।
सपा-गठबंधन के सभी समर्थक व कार्यकर्ता वोटिंग के समय पूरी निगरानी रखें। https://t.co/Qfw4F8Ssl1
अखिलेश यादव यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ हा दिव्यांग सुरेंद्र यांनी केलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आला आहे. जगराजपूर गावातील सुरेंद्र यांनी पोलिंग पार्टीवर आरोप केला होता की, ते सायकलला मत देऊ इच्छित होते. मात्र पोलिंग पार्टीने त्यांचे मत भाजपाचे चिन्ह असलेल्या कमळाला दिले.
या प्रकरणी जगराजपूरमध्ये विरोधही झाला. त्यानंतर प्रशासकीय स्तरावर तपासाची कारवाई सुरू झाली. तसेच तपासामध्ये मायक्रो प्रेक्षकांनी आपला रिपोर्ट जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवला आहे. मायक्रो प्रेक्षक अरुण कुमार गौड यांनी आपल्या रिपोर्टमध्ये घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, व्हिडीओ कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान मतदान करण्यात आले आहे. तसेच जे मतदार मतदान करण्यास नकार देत होते. त्यांच्या सह्या घेतल्या जात होत्या. जेव्हा पथक गावात पोहोचले तेव्हाच गावकऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर या पथकाने कशीबशी आपली सुटला करून घेतली.