UP Assembly Election 2022: कॅबिनेट मंत्र्यांवर वरचढ ठरले राज्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:49 AM2022-02-01T06:49:40+5:302022-02-01T06:50:15+5:30
Uttar Pradesh Assembly Election News: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे स्थान केंद्र सरकारमध्ये पंतप्रधानांनंतर दुसरे आहे. परंतु, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते त्यांच्या कोणत्याही समर्थकाला तिकीट देऊ शकले नाहीत.
विधान परिषदेची निवडणूक का?
उत्तर प्रदेशच्या इतिहासात प्रथमच विधान परिषद आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेतल्या जात आहेत. १० फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होत असून विधान परिषदेच्या ३५ जागांसाठी मतदान ३ आणि ७ फेब्रुवारी रोजी होईल. याचा अर्थ भाजप निवडणूक निकालाबद्दल निश्चिंत नाही. आता भाजपचे ४०३ सदस्यांच्या विधानसभेत ३२५ सदस्य आहेत. त्यापेक्षाही कमी जागा जिंकल्या तर विधान परिषदेच्याही जागा कमी होतील. त्याने परिषदेच्या निवडणुकीत विलंब यासाठी केला की कोणताही मोठा नेता विधानसभा निवडणूक जिंकू शकला नाही तर त्याला विधान परिषदेत जागा मिळू शकते. परंतु, आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची काळजी जास्त आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा आणि विधान परिषदेचे एक-एक मत महत्त्वाचे असेल.
कॅबिनेट मंत्र्यांवर भारी राज्यमंत्री
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे स्थान केंद्र सरकारमध्ये पंतप्रधानांनंतर दुसरे आहे. परंतु, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते त्यांच्या कोणत्याही समर्थकाला तिकीट देऊ शकले नाहीत. लखनौतून खासदार राजनाथ सिंह बक्षी का तालाब येथून अविनाश त्रिवेदी यांना आणि बछरावातून राम नरेश रावत यांना तिकीट देऊ इच्छित होते. परंतु, या दोन्ही जागांवर केंद्रीय शहर विकास राज्य मंत्री कौशल किशोर यांचा विरोध प्रभावी ठरला. राजनाथ सिंह यांच्या कट्टर समर्थकांना तिकिटापासून वंचित करून टाकले.
सासू सपात, जावई भाजपात
दलित पासी समाजाशी संबंधित सुशीला सरोज समाजवादी पार्टीच्या तिकिटावर लखनौच्या जवळ मलिहाबाद मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्या मोहनलालगंजच्या खासदार होत्या. त्या आधी सरोज विधानसभा सदस्य आणि राज्य सरकारमध्ये मंत्री होत्या; परंतु त्यांचे जावई भाजपात दाखल झाले आणि सिंधौली मतदारसंघातून ते उभे आहेत.
स्वातंत्र्यसैनिकाचा गड धोक्यात
उत्तराखंड क्रांती दलने राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कुमायूची द्वाराहाट आणि डीडीहाटशिवाय गढ़वालच्या देवप्रयाग मतदारसंघातही पार्टी काम करीत आहे. १९९९ मध्ये राज्य स्थापन झाल्यावर या जागांवर बहुतांश वेळा या पक्षाचे उमेदवारच जिंकले आहेत; परंतु यावेळी या जागा वाचवणे उत्तराखंड क्रांती दलासाठी आव्हानाचे ठरत आहे.
जुने व्हिडिओ वायरल
भगवंत मान यांना आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याला ना त्यांचा पक्ष कारण आहे ना विरोधी काँग्रेस किंवा भाजप. त्याचे कारण आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस. त्यामुळे फेसबुक आणि यूट्यूब चर्चेत आलेल्या व्यक्तीच्या पोस्ट आपोआप सर्चमध्ये सगळ्यात वर दिसू लागतात. भगवंत मान यांनी त्यांचे करियर स्टैंड अप कॉमेडियन म्हणून सुरू केले होते. परंतु, २०१२ मध्ये ते पूर्णपणे राजकारणात सक्रिय झाले. मान या व्हिडिओमुळे अजिबात वैतागलेले नाहीत. त्यांचे म्हणणे असे की, यामुळे माझा मोफत प्रचार होत आहे.