UP Assembly Election 2022: अपक्ष उमेदवार चालवतोय 'मोदी रसोई'!; दररोज शेकडो जणांना देतोय जेवण, होतेय देशभर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 08:38 PM2022-02-08T20:38:08+5:302022-02-08T20:39:04+5:30
उत्तर प्रदेशच्या सीतापूर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार साकेत मिश्रा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सीतापूर-
उत्तर प्रदेशच्या सीतापूर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार साकेत मिश्रा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपानं तिकीट दिलं नाही म्हणून काय झालं साकेत मिश्रा आजही निवडणूक काळात 'मोदी रसोई' नावानं खानावळ चालवत आहेत. 'मोदी रसोई'तून आजंही शेकडो जणांना जेवण ते देत आहेत. साकेत मिश्रा सीतापूर मतदार संघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवाराच्या स्वरुपात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून ते 'मोदी रसोई' नावानं खानावळ चालवत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून तिकीट दिलं जाईल अशी अपेक्षा त्यांना होती. पण त्यांना पक्षानं तिकीट दिलेलं नाही. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आणि सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा होऊ लागली. सध्या साकेत मिश्रा अपक्ष उमेदवार म्हणून आपलं नशीब आजमावत आहेत आणि भाजपा उमेदवाराला पण जोरदार टक्कर देत आहेत. तसंच ते आजही मोदी रसोई नावानं खानावळ चालवत आहेत.
'मोदी रसोई'वर काय म्हणाले साकेत मिश्रा?
"मी गेल्या दोन महिन्यांपासून स्वत: 'मोदी रसोई' चालवत आहे आणि स्वत: जेवण तयार करून नागरिकांना देत आहेत. भाजपाच्या इतर कोणत्याही कार्यकर्त्याला तिकीट दिलं असतं तर माझा काहीच आक्षेप नव्हता. पण ज्या व्यक्तीनं सपासोबत साटंलोटं केलं होतं अशा व्यक्तीला तिकीट दिल्यानं नाराजी आहे. माझं तिकीट कापण्यात मोदी किंवा योगी यांची काहीच चूक नाही. त्याखालील खासदार आणि जिल्हा अध्यक्षांनी मला धोका दिला आहे. तिकीट न देता माझा राजकीय खून केला आहे", असं साकेत मिश्र म्हणाले.
१४ वर्षांपासून करताहेत भाजपाची सेवा
अपक्ष उमेदवार म्हणून साकेत मिश्रा निवडणुकी रिंगणात उतरल्यानं भाजपा उमेदवाराला मोठा धक्का बसणार आहे. तसंच सपाचे चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या राधेश्याम जयसवाल यांना ते जोरदार टक्कर देत आहेत. गेल्या १४ वर्षांपासून साकेत मिश्रा भाजपामध्ये होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचं कार्यकर्त्यांसोबत देखील नाळ जोडलेली आहे. पण ऐनवेळी पक्षाकडून तिकीट कापण्यात आल्यामुळे ते नाराज झाले होते. अखेरीस त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपाशी बंडखोरी केली आहे.