UP Assembly Election 2022 Results: 'जो नोएडात आला त्याची सत्ता गेली', 30 वर्षांनंतर मुख्यमंत्री योगींचा गृहितकाला छेद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:30 PM2022-03-10T17:30:01+5:302022-03-10T20:34:36+5:30
UP Assembly Election 2022 Results : 'जो नेता नोएडाला येतो त्याची सत्ता जाते, असा गैरसमज गेल्या 30 वर्षांपासून होता. यामुळे अनेक नेते नोएडाला यायला घाबरत असे. पण, अखेर योगींनी हा गैरसमज दूर केला आहे.
नोएडा: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल (UP Assembly Election 2022 Results) जवळपास स्पष्ट झाले असून आता राज्यात भाजपचे पुनरागमन झाले आहे. ताज्या ट्रेंडनुसार, भाजप पूर्ण बहुमताने स्वबळावर सरकार स्थापन करणार आहे. सध्या भाजप (BJP) 260 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. यानुसार आता भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेत येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी 'मिथ ऑफ नोएडा' या कल्पनेलाही खोडा घातला आहे.
यूपीत पुन्हा योगी सरकार
निवडणूक निकालांनुसार, योगी आदित्यनाथ गोरखपूर शहराच्या जागेवरून विजयी झाले आहेत, तर दुसरीकडे भाजपने गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील तीनही जागा आपल्या झोळीत टाकल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज सिंह यांनीही नोएडामधून बंपर विजय नोंदवला आहे. नोएडा, दादरी आणि जेवार विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यात येतात. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडाला भेट देणारा उत्तर प्रदेशचा कोणताही मुख्यमंत्री कधीही सत्तेत येत नाही, अशी धारणा गेल्या तीन दशकांपासून होती.
मायावतींनी सत्ता गमावली
मार्च 2007 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार्या मायावती त्या वर्षी नोएडाला त्यांचे जवळचे मित्र सतीश मिश्रा यांच्या नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुखांच्या या धाडसी हालचालीला त्यावेळी समज मोडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. परंतु 2012 मध्ये त्यांची सत्ता गेल्यानंतर हा समज कायम राहिला.
इतर नेत्यांच्या मनात नोएडाची भीती
मायावती ग्रेटर नोएडातील बदलपूर गावातील आहेत. त्यांच्यापूर्वी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, भाजपचे राजनाथ सिंह आणि कल्याण सिंह यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात नोएडाला भेट दिली नव्हती. 2012 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले मुलायम सिंह यांचे पुत्र अखिलेश यादव त्यांच्या काळात कधीच नोएडाला गेले नाहीत.
काँग्रेसचा पराभव
2013 मध्ये नोएडा येथे झालेल्या आशियाई विकास बँकेच्या परिषदेला अखिलेश यादव उपस्थित राहिले नव्हते. त्या परिषदेला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे प्रमुख पाहुणे होते. यानंतर 2014मध्ये काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजपची देशात सत्ता आली. यावरुन अनेक नेत्यांच्या मनात नोएडाविषयी भीती बसलेली होती.
योगींनी दूर केला गैरसमज
2017 मध्ये उत्तर प्रदेशची जबाबदारी स्वीकारलेल्या योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून डझनभर वेळा नोएडाला भेट दिली आहे. नोएडामध्ये मेट्रोच्या उद्घाटनाशिवाय त्यांनी इतर अनेक प्रकल्प सुरू केले. जानेवारीमध्ये त्यांनी गौतम बुद्ध नगर गाठून कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेतला. अशा स्थितीत नोएडात येऊनही योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत, त्यामुळे यावेळी नोएडाबाबतचा समज अखेर दूर झाला आहे.