UP Assembly Election 2022: पक्षबदलाचे साईड इफेक्ट्स, उमेदवार आपलं चिन्हच विसरले आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 07:08 AM2022-01-31T07:08:55+5:302022-01-31T07:09:30+5:30
UP Assembly Election 2022: ऐन निडवणुकीच्या तोंडावर एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांची उत्तर प्रदेशात मोठी यादी आहे; परंतु आग्रा येथील मधुसूदन शर्मा यांनी जे केले ते इतिहासात कधीच झाले नसावे.
- शरद गुप्ता
वेगवेगळा स्वाभिमान
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यातील प्रेम जगजाहीर आहे. योगींनी ठाकूरवादाच्या आरोपाबाबत विचारले असता, त्यावर स्वाभिमानाने सांगितले की, मी क्षत्रिय कुटुंबात जन्मलो याचा अभिमान आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मौर्य यांनी ट्विट केले की, कमळाचे फूल हा माझा स्वाभिमान आहे. यापूर्वीही निवडणुकीत पुढील मुख्यमंत्री म्हणून योगी यांचा उल्लेख करण्याबाबत मौर्य यांनी सार्वजनिकरीत्या आक्षेप नोंदवलेला आहे.
पक्षबदलाचे साईड इफेक्ट
ऐन निडवणुकीच्या तोंडावर एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांची उत्तर प्रदेशात मोठी यादी आहे; परंतु आग्रा येथील मधुसूदन शर्मा यांनी जे केले ते इतिहासात कधीच झाले नसावे. नामांकनाच्या दोन दिवस आधी त्यांनी बसपा सोडून सपामध्ये प्रवेश केला. बाह विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी निघाले तेव्हा सवयीप्रमाणे लोकांना आवाहन केले की, १० फेब्रुवारीच्या मतदानात प्रत्येकाने हत्तीचे बटन दाबावे. या आवाहनाने लोक आश्चर्यचकित झाले. कारण उमेदवार महाशय स्वत:च विसरले होते की, सपाचे निवडणूक चिन्ह हत्ती नव्हे तर सायकल आहे.
पिच्छा सुटत नाही
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत; परंतु दुर्दैव त्यांचा पिच्छा सोडत नाही. मागील वेळी दोन ठिकाणी लढूनही पराभूत होणारे रावत यांनी यावेळी जागा बदलून जिम कॉर्बेट पाकच्या जवळील रामनगरहून लढण्याचा निर्णय घेतला; परंतु तेथील विद्यमान आमदार रणजीत रावत यांनी त्यांच्यासाठी जागा सोडण्यास नकार दिला. त्यांनी थेट इशाराच दिला की, असे झाल्यास एक तर भाजपमध्ये जाईन अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढवीन. पक्षाने हरीश रावत यांना जागा बदलून लाल कुआं दिली; परंतु तेथील उमेदवार संध्या दालकोटी याही मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी रावत यांची दोनदा भेट घेतली असली तरी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाच.
सर्वांत गरीब लल्लू
उत्तर प्रदेश व बिहारमधील निवडणुका धनबल व बाहुबलावर जिंकल्या जातात. यूपीमध्ये भाजपचे ३०४ पैकी २३५, सपाचे ४७ पैकी ४२ व बसपाचे १७ पैकी १५ आमदार कोट्यधीश आहेत. मागील वेळी जिंकलेल्या आमदारांची सरासरी संपत्ती ५.८५ कोटी रुपये होती; परंतु उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू राज्यातील ४०३ आमदारांमध्ये सर्वांत गरीब आहेत. त्यांच्याकडे केवळ ३.२९ लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे ना घर आहे ना जमीन. ते फक्त एक मोटारसायकल व एका स्कॉर्पिओचे मालक आहेत.
राजधानीचा मालक कोण?
यूपीची राजधानी लखनौमधून भाजप व सपाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. राज्यातील अनेक जागांवर दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले आहेत. पूर्वांचलमध्ये अखेरच्या दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. येथे दोन्ही पक्ष लखनौच्या सर्व जागांवर आपले पत्ते खुले करण्यास तयार नाहीत. भाजपकडे लालजी टंडन यांचे पुत्र गोपाल, अपर्णा यादव, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा व बलाढ्य विधिमंत्री बृजेश पाठक यांच्यासारखे नेते आहेत, तर सपाकडेही रीता बहुगुणा जोशींचे पुत्र मयंक यांच्यासह अनेक बडे नेते आहेत.