केंद्रीय मंत्री आणि भाजपा उमेदवार एस. पी. सिंह बघेल यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 10:20 AM2022-02-16T10:20:02+5:302022-02-16T10:24:28+5:30
BJP S P Singh Baghel And UP Assembly Election 2022 : मैनपुरी येथील करहल मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याविरुद्ध लढत असलेले भाजपा उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री हल्ला झाला.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मैनपुरी येथील करहल मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याविरुद्ध लढत असलेले भाजपा उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल ( BJP S P Singh Baghel) यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री हल्ला झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून बघेल हे थोडक्यात बचावले असून ते सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. करहलच्या रहमतुल्लाहपूर गावात ही घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बघेल यांना जीवे मारण्याचा हल्लेखोरांचा कट, सपाच्या गुंडांनीच हल्ला केला असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एस. पी. सिंह बघेल हे प्रचारावरून परतत असतानाच त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. शेतात आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक दगडफेक सुरू केली. त्यामुळे ताफा थांबवण्यात आला असता हल्लेखोर रस्त्यावर आले आणि त्यांनी ताफ्यातील गाड्यांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. हल्लेखोर काहीवेळातच तिथून पसार झाले. याबाबत पोलिसांना माहिती देताच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी करण्यात येत असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी या हल्ल्यावरून थेट समाजवादी पक्षावर हल्ला केला आहे. बघेल यांना जीवे मारण्याचा हल्लेखोरांचा कट होता. सपाच्या गुंडांनीच हा हल्ला केला आहे. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे मौर्य यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनीही सपावर हल्ला केला. अखिलेश यांना पराभव डोळ्यापुढे दिसत असल्यानेच गुंडांकरवी दहशत पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
श्री अखिलेश यादव जी चुनाव में हार के डर से आपने अपने पालतू गुंडों के द्वारा भाजपा प्रत्याशी केन्द्रीय मंत्री प्रोफ़ेसर SP सिंह बघेल और भाजपा नेताओं पर हमला करवाते हो,आपने हमला नहीं अपनी पराजय सुनिश्चित की है,क्या यही नई सपा है जो आपके ख़िलाफ़ चुनाव लड़े उस पर हमला कराओगे!
— Keshav Prasad Maurya (@kpmaurya1) February 15, 2022
मैनपुरी के करहल विधानसभा क्षेत्र से भाजपा प्रत्याशी केन्दीय मंत्री प्रोफ़ेसर SP सिंह बघेल के क़ाफ़िले पर सपाई गुंडों द्वारा हमला करना,असली चरित्र दिखाया है,कल ही भाजपा सांसद श्रीमती गीता शाक्य पर भी हमला किया गया था दोनों घटनाओं के दोषियों के विरूद्ध कठोर कार्रवाई की जाएगी !
— Keshav Prasad Maurya (@kpmaurya1) February 15, 2022