UP Assembly Election 2022: भाजपच्या अपर्णा यादव दीर अखिलेश यादव यांच्याविराेधात लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:55 AM2022-01-31T06:55:02+5:302022-01-31T06:57:48+5:30
UP Assembly Election 2022: भाजपमध्ये दाखल झालेल्या अपर्णा यादव यांना त्यांचे दीर सपाचे नेते अखिलेश यादव यांच्याविराेधात करहल येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. स्वत: अपर्णा यादव यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या आखाड्यात भाजपकडून समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्या कुटुंबाच्या गडाला भेदण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या अपर्णा यादव यांना त्यांचे दीर सपाचे नेते अखिलेश यादव यांच्याविराेधात करहल येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. स्वत: अपर्णा यादव यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
करहल मतदारसंघ हा मैनपुरी जिल्ह्यात येताे. मैनपुरी हा कायम यादव कुटुंबीयांचा गड राहिला आहे. अखिलेश यादव साेमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून अद्याप त्यांच्याविराेधात काेणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र, अपर्णा यादव यांना अखिलेश यांच्याविराेधात उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र, करहलबाबत संकेत देताना स्वत: अपर्णा यादव यांनी सांगितले, की पक्षाने निर्देश दिल्यास मी अखिलेश यांच्याविराेधात निवडणूक लढू शकते. हा निर्णय पक्ष घेईल.
२०१७ मध्येही लढविली हाेती निवडणूक
करहल येथून काँग्रेसने ज्ञानवती यादव आणि बसपने कुलदीप नारायण यांना उमेदवारी दिली आहे. अपर्णा यादव यांना सध्या लखनौ कँट येथून भाजपने उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी २०१७ मध्ये त्यांना भाजपच्या रिटा बहुगुणा जाेशी यांनी पराभूत केले हाेते. मात्र, अपर्णा यादव यांना भाजपने उमेदवारी दिल्यास करहल येथील लढत लक्षवेधी ठरणार आहे