Narendra Modi: भर सभेत कार्यकर्त्याच्या पाया पडले नरेंद्र मोदी, जाणून घ्या यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 07:49 PM2022-02-20T19:49:43+5:302022-02-20T19:50:35+5:30
यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली असून ते विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दरम्यान, आज(रविवार) एका प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे एक वेगळे रुप सर्वांना पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदींनी भर सभेत एका भाजप कार्यकर्त्याच्या पायाला स्पर्श केला. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी उन्नाव येथे आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी मोदींना भगवान श्रीरामाची मूर्ती भेट दिली. मूर्ती दिल्यानंतर अवधेश कटियार यांनी पीएम मोदींच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर पीएम मोदींनी अवधेश कटियार यांना यासाठी मनाई केली आणि शिष्टाचार म्हणून पंतप्रधानांनी स्वतः अवधेशच्या पायाला स्पर्श केला.
एक कार्यकर्ता के पैर सिर्फ मोदीजी ही छू सकते है
— Arun Yadav (@beingarun28) February 20, 2022
वजह ये है कि श्रीराम की मूर्ति देने वाले से खुद के पैर नहीँ छुआ सकते pic.twitter.com/SiJQQrdC9s
रामाची मूर्ती भेट म्हणून देणाऱ्याने पायाला स्पर्श करू नये, असे पंतप्रधानांच्या कृत्यामागचे कारण आहे. पंतप्रदानांच्या या कृत्याचे अनेकजण कौतुक करत आहेत. भाजप नेते अरुण यादव यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले
उत्तर प्रदेशमध्ये रविवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. राज्यात 7 टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असून 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यावेळी भाजप आणि सपामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. पक्षांचे बडे नेते निवडणूक अनेक रॅलींना संबोधित करत असून एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली असून ते विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.