UP Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशात निर्विवाद विजय मिळवणाऱ्या भाजपाला जबर धक्का, थेट उपमुख्यमंत्रीच पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:16 PM2022-03-10T23:16:26+5:302022-03-10T23:17:10+5:30
UP Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशमधील सिराथू मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दिग्गज नेते केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव झाला आहे.
लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने निर्विवाद विजय मिळवला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपाने २५० हून अधिक जागा जिंकल्या असून, मित्रपक्षांसह २७४ जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजपाच्या या मोठ्या विजयाला गालबोल लागले आहे. उत्तर प्रदेशमधील सिराथू मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दिग्गज नेते केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव झाला आहे.
सिराथू मतदारसंघातील लढत केशव प्रसाद मौर्य यांना जड जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. सपाकडून लढत असलेल्या अपना दलच्या नेत्या पल्लवी पटेल यांनी केशव प्रसार मौर्य यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. दरम्यान, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच पल्लवी पटेल ह्यांनी केशव प्रसाद मौर्य यांच्यावर माफक आघाडी घेतली होती. अनेक चढउतारानंतर त्यांनी ही आघाडी टिकवली आणि अखेरीस केशव प्रसाद मौर्य यांना ७ हजार ३३७ मतांनी पराभव पत्करावा लागला.
सिराथू मतदारसंघात केशव प्रसाद मौर्य पिछाडीवर पडल्यानंतर मतमोजणी केंद्रात तणाव निर्माण झाला होता. काही काळ मतमोजणी ही थांबवण्यात आली होती. दरम्यान, मतमोजणी संपल्यानंतर पल्लवी पटेल यांना ७ हजार ३३७ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर केशव प्रसाद मौर्य यांनी आपला पराभव मान्य केला आहे. सिराथू मतदारसंघातील जनतेने दिलेला निर्णय मी स्वीकारत आहे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्यांचेय मी आभार मानतो. तसेच ज्यांनी मला मतदान केले त्यांच्याप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
"I accept the mandate in Sirathu," tweets UP Deputy CM and BJP's Keshav Prasad Maurya after losing to SP's Pallavi Patel by a margin of 7337 votes.#UPElections2022Resultspic.twitter.com/GLjpmix3gi
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
दरम्यान, आतापर्यंतच्या निकालांनुसार भाजपा आणि मित्रपक्ष २७४ मतदारसंघात आघाडीवर आहेत. तर सपा आणि मित्रपक्ष १२३ मतदारसंघात आघाडीवर आहेत. काँग्रेसला २ तर बसपाला १ जागा मिळाली आहे.