UP Assembly Election Result 2022: जिथे शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्यात आलं त्या लखीमपूर खेरीमध्ये लागला असा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 09:49 PM2022-03-10T21:49:27+5:302022-03-10T21:51:06+5:30
UP Assembly Election Result 2022: लखीमपूर खेरीमधील तिकुनिया (Lakhimpur Kheri Violence ) येथे केंद्रीयमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्या कारने चिरडल्याने काही शेतकरी आँदोलकांचा मृत्यू झाला होता. त्याविरोधात मोठा जनक्षोभ उसळला होता.
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने बंपर विजय मिळवला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली. दरम्यान, शेतकरी आंदोलनादरम्यान लखीमपूर खेरी येथे झालेल्या घटनेमुळे उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका झाली होती. लखीमपूर खेरीमधील तिकुनिया येथे केंद्रीयमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्या कारने चिरडल्याने काही शेतकरी आँदोलकांचा मृत्यू झाला होता. त्याविरोधात मोठा जनक्षोभ उसळला होता. दरम्यान, जिथे ही घटना घडली होती. त्या निघासन मतदारसंघात आणि लखीमपूर खेरी लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत.
लखीमपूरमध्ये ज्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राच्या गाडीने चिरडले त्या जागेचे नाव तिकुनिया होते. तिकुनिया हे ठिकाणी निघासन विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. या ठिकाणी भाजपाच्या शशांक वर्मा यांनी विजय मिळवला आहे. तप समाजवादी पक्षाचे आरएस कुशवाहा दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर बसपाचे आरएस उस्मानी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
लखीमपूर खेरीमध्ये एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. येथील पलिया, निघासन, गोला, श्रीनगर, धौरहरा, लखीमपूर, कास्ता आणि मोहम्मदी. या सर्व आठ मतदारसंघात भाजपाने विजय मिळवला आहे. लखीमपूर खेरीमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान झाले. येथे एकूण ६२.४५ टक्के मतदान झाले होते.
लखीमपूर खेरीमधील पलियामध्ये भाजपाचे हरविंदर सिंह साहनी रोमी, कास्ता विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे सौरव सिंह सोनू, धौराहरामधून भाजपाचे विनोद शंकर अवस्थी, श्रीनगरमधून भाजपाचे मंजू त्यागी. त्याशिवाय गोला येथून भाजपाचे अरविंद गिरी, तर निघासन येथून शशांक वर्मा विजयी झाले. लखीमपूर सदर येथून योगेश वर्मा आणि मोहम्मदी येथून लोकेंद्र प्रताप सिंह यांनी विजय मिळवला.