UP Assembly Election: 'देश शरियतने नाही तर संविधानाने चालेल', योगींचे विरोधकांवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:56 AM2022-02-14T11:56:37+5:302022-02-14T11:57:49+5:30
UP Election: "भारतीय राज्यघटनेनुसार व्यवस्था चालली पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे. वैयक्तिक श्रद्धा, मूलभूत अधिकार, आमच्या वैयक्तिक आवडी-निवडी देशावर किंवा संस्थांवर लादू शकत नाही.''
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, हा नवीन भारत शरिया कायद्यानुसार नाही तर राज्यघटनेनुसार काम करेल, असे ते म्हणाले. राज्यात सात टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात आज नऊ जिल्ह्यांतील एकूण 55 जागांसाठी मतदान होत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'गझवा-ए-हिंदचे स्वप्न पाहणाऱ्या 'तालिबानी विचारसरणी'च्या धार्मिक कट्टरतावाद्यांनी लक्षात ठेवावं...ते राहतील किंवा न राहतील, भारत शरियतनुसार नाही, तर संविधानालानुसार चालेल. जय श्री राम!'
हा नवा भारत आहे
योगी आदित्यनाथ यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला आहे की त्यांची "80 विरुद्ध 20" ही टिप्पणी "विकासाचे समर्थन करणारे आणि प्रत्येक गोष्टीला विरोध करणारे यांच्यातला फरत दाखवणारी आहे. ते पुढे म्हणाले की, "मी पूर्ण स्पष्टपणे सांगू शकतो की, हा नवा भारत आहे. हा जगातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारत आहे. या नव्या भारतात विकास सर्वांचा असेल."
हिजाब वादावर प्रतिक्रिया
यावेळी त्यांनी कर्नाटकातील हिजाब वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, "भारतीय राज्यघटनेनुसार व्यवस्था चालली पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे. आम्ही आमच्या वैयक्तिक श्रद्धा, आमचे मूलभूत अधिकार, आमच्या वैयक्तिक आवडी-निवडी देशावर किंवा संस्थांवर लादू शकत नाही मी उत्तर प्रदेशातील लोकांना आणि कार्यकर्त्यांना भगवा घालायला सांगतोय का? त्यांना काय घालायचे आहे, ही त्यांची निवड आहे. पण शाळांमध्ये ड्रेस कोड असायला हवा, हा शिस्तीचा भाग आहे'', असेही ते म्हणाले.