UP Assembly Election: योगींकडे रिव्हॉल्व्हर आणि रायफल, यूपीच्या इतर चार मुख्यमंत्र्यांकडे कोणती शस्त्रे आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 06:08 PM2022-02-06T18:08:28+5:302022-02-06T18:08:35+5:30
UP Assembly Election: यंदाच्या निवडणुकीत एक विद्यमान आणि एक माजी मुख्यमंत्री निवडणूक रिंगणात आहे. सीएम योगी आदित्यनाथ गोरखपुर शहरातून आणि सपा प्रमुख अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
कानपूर: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी आपल्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. त्याचबरोबर या नेत्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांची माहितीदेखील निवडणूक आयोगाला दिली आहे. निवडणूक आयोगाकडे आलेल्या माहितीनुसार, उच्च सुरक्षेत कार्यरत असलेल्या यूपीच्या पाच माजी मुख्यमंत्र्यांकडे शस्त्रे असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणाकडे किती शस्त्रे
गोरखपूर शहरातून नुकताच उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे एक लाखाचे रिव्हॉल्व्हर आणि 80 हजारांची रायफल असल्याचे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी 55 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. तर राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्याकडे रिव्हॉल्व्हर आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगात हे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे रिव्हॉल्व्हर आणि दोन बंदुका आहेत. राजनाथ सिंह 2000 मध्ये यूपीचे मुख्यमंत्री झाले होते आणि जवळपास दीड वर्षे या पदावर राहिले. त्यांच्याकडे 32 बोअरचे रिव्हॉल्व्हर आहे.
मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांच्याकडे शस्त्रे नाहीत
राज्याचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्याकडे कोणतेही शस्त्र नाही. मुलायम सिंह तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री होते आणि सध्या ते मैनपुरीमधून लोकसभेचे खासदार आहेत. मुलायम सिंह यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांच्याकडेही शस्त्र नाही. 2012 ते 2017 या काळात राज्यात मुख्यमंत्री राहिलेल्या अखिलेश यादव यांच्याकडेही शस्त्र नाही. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, अखिलेश यादव यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. पण तो बँकेचाही कर्जदार आहे.