'योगी आदित्यनाथांना माझी हत्या करायची आहे', ओम प्रकाश राजभर यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:14 AM2022-02-15T11:14:04+5:302022-02-15T11:14:32+5:30
up assembly elections 2022 : योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे, असा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.
लखनऊ : सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (Suheldev Bhartiya Samaj Party) अध्यक्ष ओम प्रकाश राजभर (Om Prakash Rajbhar) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे, असा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.
ओम प्रकाश राजभर म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे. त्यांचे गुंड बनारसला पाठवण्यात आले होते. काही काळ्या कोटचे गुंड होते तर काही बाहेरून पाठवलेले होते. डीएम आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार लोक पोहोचवण्यात आले. निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नामांकन कक्षात उमेदवार, प्रस्तावक आणि वकील असे तीनच लोक असले पाहिजे. मात्र, फक्त तीन लोक नामांकन कक्षात जाऊ शकत, असे असताना शेकडो लोक तिथे कसे पोहोचले? असा सवाल ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.
सुरक्षा पुरवण्याची मागणी
ओम प्रकाश राजभर म्हणाले की, "निवडणूक आयोगाने मला सुरक्षा द्यावी, अन्यथा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ माझी हत्या करू शकतात. पण दलित-गरीब-मागासांचा हा लढा थांबणार नाही, असा इशारा मला द्यायचा आहे. मी माझ्यासारखे हजारो ओम प्रकाश राजभर निर्माण केले आहेत. एका ओम प्रकाश राजभरला मारले तर हजार ओम प्रकाश राजभर समोर येतील."
ओम प्रकाश राजभर यांचा गंभीर आरोप
दरम्यान, 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान ओम प्रकाश राजभर यांचे हे विधान राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे बोलले जात आहे. तसेच, भाजपा आरक्षण संपवत असल्याचा आरोपही ओम प्रकाश राजभर यांनी केला. बनारसला गेल्यावर लोकांनी गोंधळ घातल्याचा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला. ते लोक भाजपने पाठवलेले गुंड होते. ते माझी हत्या सुद्धा करू शकले असते, असे ओम प्रकाश राजभर म्हणाले.
डीएम आणि पोलीस आयुक्तांना हटवण्याची मागणी
ओम प्रकाश राजभर हे शिवपूर विधानसभा मतदारसंघातून आपला मुलगा अरविंद राजभर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता, त्यांना विरोध करण्यात आला आणि न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर ओम प्रकाश राजभर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि वाराणसीच्या डीएम आणि पोलिस आयुक्तांना हटवण्याची मागणी केली. तसेच, निवडणूक आयोगाकडे आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.