UP Assembly Elections: टिकेत बंधूंनी सपा युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 10:34 AM2022-01-19T10:34:49+5:302022-01-19T10:36:38+5:30
नरेश टिकेत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते सपा उमेदवारांचा प्रचार करताना दिसतात.
- शरद गुप्ता
नवी दिल्ली : भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकेत प्रयागराजमध्ये सोमवारी समाजवादी पार्टीच्या उमेदवार रिचा सिंह यांचा प्रचार करताना दिसले. साधारण त्याचवेळी त्यांचे बंधू नरेश टिकेत यांनी मुजफ्फरनगरमध्ये निवेदन प्रसिद्धीस देऊन सपा युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला.
नरेश टिकेत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते सपा उमेदवारांचा प्रचार करताना दिसतात. जाट मतांच्या चिंतेत केंद्रीय मंत्री संजीव बालियान सोमवारी सकाळी नरेश टिकेत यांना भेटायला गेले. दुपारी नरेश टिकेत यांनी सपाला दिलेला पाठिंबा मागे घेतला. टिकेत बंधूंवर दोन्हीकडून मोठा दबाब आहे.
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची इच्छा होती की, नरेश टिकेत यांचा मुलगा किंवा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते धर्मेंद्र मलिक यांनी बड़ौतहून रालोदच्या तिकिटावर लढावे. त्यामुळे जाट समाजात स्पष्ट संदेश जाईल की, टिकेत बंधू सपा-रालोद युतीसोबत आहेत.
नरेश टिकेत आपले उमेदवार देण्यास तयार नाहीत. परंतु, त्यांनी काही सपा - रालोद उमेदवारांना पाठिंब्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मंत्री संजीव बालियान त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी आवाहन परत घेतले. टिकेत बंधूही बालियान खापचे आहेत.
सपाला भीती आहे की, जाट रालोद उमेदवारांना मत तर देतील. परंतु, युतीमध्ये जेथे सपा उमेदवार आहेत, त्यांना मत न देता जाट भाजपच्या बाजूने मत देऊ शकतात. यामागे २०११मध्ये मुजफ्फरनगर दंगलींनंतर सुरू झालेला जाट - मुस्लिम संघर्षही एक कारण आहे. एक जाट नेता म्हणतो की, आमच्या जखमा अजून भरल्या नाहीत.