निष्काळजीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात 'आरोग्याशी खेळ'; रुग्णांना दिलं एक्सपायर्ड झालेलं दूध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 04:16 PM2022-04-14T16:16:43+5:302022-04-14T16:26:48+5:30
जिल्हा महिला रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना एक्सपायर झालेलं दूध दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.
नवी दिल्ली - सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार आता समोर आला आहे. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करण्यात आला असून निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. दुधाबाबत मोठा हलगर्जीपणा करण्यात आला. रुग्णांना एक्सपायर्ड झालेलं दूध देण्यात आलं. उत्तर प्रदेशमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बलिया जिल्हा महिला रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना एक्सपायर झालेलं दूध दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनाने याचा अधिक तपास सुरू केला आहे.
प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या महिलांच्या आरोग्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने दूध देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याअंतर्गत बलिया जिल्हा महिला रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना दूध देण्याचा ठेका एका फर्मला देण्यात आला होता, मात्र या ठेकेदाराच्या वतीने जिल्हा महिला रुग्णालयात दाखल रुग्णांना एक्सपायरी डेटचे दूध देण्यात येत होते. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी एक्सपायरी डेटचे दूध पाहून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
बलिया जिला महिला अस्पताल में भर्ती मरीजों को दिया गया एक्सपायरी डेट का दूध । CMS राशिद इमामुद्दीन ने बैठाई जांच ।दोषी पाये जाने पर ब्लैक लिस्ट होंगा वेंडर उत्तर प्रदेश सरकार द्वारा प्रसव के लिए जिला महिला अस्पताल में भर्ती महिलाओं की सेहत के लिए दूध देने की है व्यवस्था। pic.twitter.com/Dq3rwHDatK
— Ajay Singh (@AjayNDTV) April 14, 2022
रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून सीएमएसने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची दखल घेण्यात आल्याचे जिल्हा महिला रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राशिद इमामुद्दीन यांनी सांगितले. चौकशी सुरू करण्यात आली असून, ठेकेदाराकडून खुलासा मागवण्यासोबतच आरोप सिद्ध झाल्यास या फर्मला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. याचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.