चोरीची अनोखी घटना; ना पैसा ना दागिने, चोरट्यांनी लंपास केली 10 लाख रुपयांची कबुतरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 20:06 IST2025-02-17T20:02:23+5:302025-02-17T20:06:36+5:30
UP Crime : पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

चोरीची अनोखी घटना; ना पैसा ना दागिने, चोरट्यांनी लंपास केली 10 लाख रुपयांची कबुतरे
UP Crime : आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. चोर पैसे, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू चोरतो. पण, उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये चोरीची अनोखी घटना घडली आहे. चोरांनी चक्क घराच्या छतावरुन 400 कबुतर चोरले. ही घटना मेरठमधील लिसाडी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील लिसाडी गावात घडले. कबुतरांच्या मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी कबुतर चोरणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाजी कय्युम हे गेल्या 20 वर्षांपासून कबुतर पालनाचा व्यवसाय करतात. रविवारी रात्री चोरटे शेजारील घरात ठेवलेल्या शिडीच्या सहाय्याने कय्युम यांच्या छतावर पोहोचले. तिथे पिंजऱ्यात शेकडो कबुतरे ठेवली होती. चोरट्यांनी ही लाखो रुपयांची 400 कबुतरे चोरून नेली. या कबुतरांची किंमत 10 लाखांच्या वर असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी सकाळी कय्युम आपल्या कबुतरांना चारा देण्यासाठी गच्चीवर गेला असता, त्यांना घडलेला प्रकार समजला.
यानंतर त्यांनी पोलिसांत कबुतर चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिस आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. कय्युमच्या म्हणण्यानुसार चोरी झालेल्या कबुतरांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ही कबूतर विदेशी जातीची असून एका कबुतराची किंमत सुमारे 50 हजार रुपये होती. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.