हुंडा दिला नाही म्हणून सासूने सूनेचं आयुष्यच केलं उद्ध्वस्त, इंजेक्शनमधून दिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 15:45 IST2025-02-16T15:38:54+5:302025-02-16T15:45:18+5:30
उत्तर प्रदेशात हुंड्यासाठी सासरच्यांनी महिलेला एचआयव्ही बाधित इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हुंडा दिला नाही म्हणून सासूने सूनेचं आयुष्यच केलं उद्ध्वस्त, इंजेक्शनमधून दिले...
UP Dowry Crime: लग्नानंतर प्रत्येक जोडपं आपला संसार सुरु करत नवीन आयुष्य सुरू करतो. पण हेच लग्न उत्तर प्रदेशातील एका महिलेसाठी जीवघेणं ठरण्याची शक्यता आहे. विवाहित महिलेने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने तिच्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार करुन तिला एचआयव्ही बाधित इंजेक्शन दिले. यानंतर पोलीस विभागासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सासरच्या मंडळींना अटक केली.
उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेला एचआयव्हीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचे लग्न दोन वर्षांपूर्वी हरिद्वार जिल्ह्यातील पिरान कालियार जस्सा वाला गावातील रहिवासी व्यक्तीसोबत झाला होता. लग्नात मुलीच्या वडिलांनी सासरच्यांना गाडीशिवाय लाखोंचे दागिने आणि रोख दिले होते. जेणेकरून त्यांची मुलगी सासरच्या घरी सुखाने राहू शकेल. मात्र मुलीच्या सासरच्यांनी जादा हुंड्याची मागणी सुरू केली. हे प्रकरण मिटवण्यासाठी गावच्या पंचायतीपर्यंत हे प्रकरण गेलं. पण विवाहितेच्या सासरच्या मंडळींवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
पीडितेच्या वडिलांनी कोर्टात सांगितले की, त्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या मुलीचे लग्न केले होते आणि लग्नासाठी सुमारे ४५ लाख रुपये खर्च केले होते. लग्नानंतर लगेचच त्यांनी मुलीचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्या मुलीचा अपमान केला आणि मुलासाठी दुसरी बायको आणणार असल्याचेही सांगितले. त्यांनी हुंडा म्हणून आणखी १० लाख रुपये आणि मोठ्या एसयूव्हीची मागणी केली. महिन्याभरात तिला सासरच्या घरातून हाकलून देण्यात आले. गाव पंचायतीने हस्तक्षेप करेपर्यंत ती तीन महिने आमच्यासोबत राहिली. त्यानंतर तिला तिच्या घरी परत पाठवण्यात आले. मात्र पुन्हा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला."
"मे २०२४ मध्ये तिच्या सासरच्या लोकांनी तिला जबरदस्तीने एचआयव्ही-संक्रमित सिरिंजचे इंजेक्शन दिले आणि तिची प्रकृती झपाट्याने ढासळू लागली. वैद्यकीय तपासणीत मुलीची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आलं. तर तिचा नवरा एचआयव्ही निगेटिव्ह असल्याचे तपासणीत समोर आल्यांनंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला," अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर गंगोह पोलीस ठाण्यात तिचा पती, दीर, आणि सासू यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ३०७, ४९८अ, ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.