UP Election 2022: अखिलेश यादवांना 'ए पोलीस' महागात पडले; कार्यकर्ते एवढे बेभान झाले की सभा सोडून जावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 05:45 PM2022-02-18T17:45:45+5:302022-02-18T17:52:53+5:30
Uttar Pradesh Election 2022: मैनपूरीमध्ये अखिलेश यादव यांची सभा होती. या सभेतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दोन दिवसांपूर्वी एका सभेत कार्यकर्तांना शिस्त लावणाऱ्या पोलिसांना 'ए पोलीस' संबोधत अपशब्द वापरणे सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांना महागात पडल्याचे दिसत आहे. परिस्थिती एवढी बिकट झाली की त्यांना भर सभा सोडून जावे लागले आहे. यावेळी अखिलेश नाराज दिसले.
मैनपूरीमध्ये अखिलेश यादव यांची सभा होती. या सभेतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडले, खुर्च्या मोडल्या आणि स्टेजजवळ धाव घेतली. हाच प्रकार होईल म्हणून दोन दिवसांपूर्वीच्या सपाच्या सभेत पोलीस अशाच उत्साही कार्यकर्त्यांना शिस्त लावत होते. लाठ्या, काठ्या दाखवून खाली बसण्यास किंवा गोंधळ न घालण्यास सांगत होते. तेव्हा अखिलेश यांचे भाषण सुरु होते. अखिलेश यांनी हे पाहून ''ए पोलीस, ए पोलीस, ए पोलिसवाल्यांनो का करताय हा तमाशा? तुमच्यापेक्षा उद्धट कोणी असू शकत नाही. हे भाजपावाले करवून घेत असतील.'', असे वक्तव्य करत टाळ्या मिळविलेल्या. परंतू आज त्यांना याचे प्रात्यक्षिकच पहायला मिळाले आहे.
पाचशेहून अधिक कार्यकर्ते खूर्च्यांवर उभे राहिले होते. यामुळे मागे बसलेले कार्यकर्ते भडकले आणि विरोध करू लागले. अशातच गोंधळ उडाला आणि लोखंडी बॅरिकेड्स खाली पाडून कार्यकर्त्यांनी खुर्च्या मोडत स्टेजकडे धाव घेतली. हे पाहून अखिलेश यांनी स्टेजवरून उतरत थेट हेलिपॅड गाठले आणि निघून गेले.
या साऱ्या गोंधळता अनेक कार्यकर्ते जखमी देखील झाले आहेत. पोलिसांशी झटापट देखील झाली. सभेतील लोक परतल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास २०० हून अधिक खुर्च्या मोडलेल्या आढळल्या.