UP Election 2022: उत्तर प्रदेशातील गड राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; पंतप्रधान मोदी, गृहमंत्री ठाण मांडून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 11:19 AM2022-03-01T11:19:02+5:302022-03-01T11:19:47+5:30
UP Election 2022: भाजपला गेल्या निवडणुकीत शतप्रतिशत जागा देणाऱ्या बस्ती, कबीरनगर आणि सिद्धार्थनगर या जिल्ह्यांत गड राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क
बस्ती : भाजपला गेल्या निवडणुकीत शतप्रतिशत जागा देणाऱ्या बस्ती, कबीरनगर आणि सिद्धार्थनगर या जिल्ह्यांत गड राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे सत्तेचे समीकरण जुळविण्यासाठी या जागा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने पक्षाने सर्व शक्ती पणाला लावली आहे.
पूर्वांचलमधील बस्ती, कबीरनगर आणि सिद्धार्थनगर हे जिल्हे भाजपच्या पूर्णपणे पाठीशी राहिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत या तिन्ही जिल्ह्यांतील सर्व १३ जागा भाजपकडे होत्या. यावेळी मात्र भाजपने १३ पैकी काही उमेदवारांना उमेदवारी दिलेली नाही. त्यात कबीरनगर जिल्ह्यातील तिन्ही जागांचा समावेश आहे. येथील तिन्ही उमेदवार भाजपने बदलले असून, त्यापैकी खलिलाबादचे विद्यमान भाजपचे आमदार जय दुबे यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश करून त्या पक्षातर्फे निवडणूक लढवीत आहेत.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या गोरखपूर विभागाचा या जिल्ह्यांमध्ये प्रभाव असला तरी सध्या या भागातील ग्रामीण जनता शेती, बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नांनी नाराज दिसून येत आहे. व्यापारी, व्यावसायिकांमध्येही काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीने या भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. स्वत: पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या या भागात तीन सभा झाल्या व तीन सभांचे नियोजन आहे. आम आदमी पार्टी व शिवसेना या दिल्ली आणि महाराष्ट्रातील प्रांतिक पक्षांनी या भागात उमेदवार दिल्याने त्याचा फटका काही ठिकाणी भाजप, तर काही ठिकाणी समाजवादी पार्टीला बसणार आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपनेही या भागातील जागा कायम राखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा या भागात झाल्या असून, अजून दोन सभा होणार आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी हेदेखील प्रत्येक मतदारसंघात जाणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या बस्ती, हरिया येथे दोन सभा झाल्या आहेत. अजून दोन सभा होणार आहेत.
हेमामालिनीही सक्रिय
- अभिनेत्री हेमामालिनी यादेखील या भागात प्रचारात सक्रिय असून, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही सभा आहे.
- सर्वच वरिष्ठ नेते गड राखण्यासाठी सक्रिय झालेले दिसून येत आहेत.