UP Election 2022: वडिलांसह चार जण भोगताहेत जन्मठेप, परदेशात शिक्षण, आता सपाकडून लढवतेय निवडणूक, जाणून घ्या कोण आहे रूपाली दीक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 02:57 PM2022-01-27T14:57:16+5:302022-01-27T14:57:54+5:30
UP Election 2022 Update: भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी अखिलेश यादव यांनी कंबर कसली आहे. समाजवादी पक्ष कमकुवत असलेल्या आग्रा भागातील फतेहाबादमध्ये समाजवादी पक्षाने बाहुबली अशोक दीक्षित यांची कन्या रूपाली दीक्षित हिला उमेदवारी दिली आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि समाजवादी पक्षात सध्या चुरशीची लढत होत आहे. दरम्यान, भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी अखिलेश यादव यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघातील लढाई अटीतटीची झाली आहे. त्यातच समाजवादी पक्ष कमकुवत असलेल्या आग्रा भागातील फतेहाबादमध्ये समाजवादी पक्षाने बाहुबली अशोक दीक्षित यांची कन्या रूपाली दीक्षित हिला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाविरोधात होणारी लढाई रंगतदार झाली आहे.
बाहुबली कुटुंबातील असलेल्या रूपाली यांची कारकीर्द फार लक्षवेधी अशी आहे. रूपाली या परदेशात शिकून आल्या आहेत. दुबईमधील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. २०१७ मध्ये त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारलं होतं. मात्र आता त्या समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.
रूपाली यांनी पुण्यातील सिम्बॉयसिस इन्स्टिट्युटमधून पदवी मिळवली होती. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या परदेशात गेल्या होत्या. त्यांनी ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठामधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी दुबईच्या एका कंपनीत नोकरी केली. नंतर कुटुंबीयांच्या सांगण्यावरून त्या नोकरी सोडून देशात परत आल्या. दरम्यान, फतेहाबाद मतदारसंघातून राजेश शर्मा यांना उमेदवार बनवले होते. मात्र स्थानिक कार्यकारिणीकडून मिळालेल्या फिडबॅकनुसार पक्षाने उमेदवार बदलत रूपाली दीक्षित यांना उमेदवारी दिली.
रूपाली यांच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्यांचे वडील अशोक दीक्षित यांना परिसरात बाहुबली म्हणून ओखळले जाते. अशोक दीक्षित यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार जण हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
अशोक दीक्षित यांनी शिक्षिक सुमन यादव यांची हत्या केली होती. त्याशिवाय अन्य ६ गुन्हेही त्यांच्यावर नोंद आहेत. त्यापैकी तीन हत्येशी संबंधित आहे. अशोक दीक्षित हे मुळचे फिरोजाबादचे रहिवासी होते. नंतर ते आग्रा येथे स्थायिक झाले होते. दरम्यान २०१५ मध्ये त्यांन सुमन यादव हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली.
दरम्यान, या घटनांबाबत कुटुंबातील कुणी आपल्याला सांगितले नाही. कुटुंबातील विपरित परिस्थितीमुळे नोकरी सोडून मी घरी परत आले. २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र दोन वर्षात समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घेतले. आता सपाने मला उमेदवारी दिली. दरम्यान, भाजपाने येथून छोटेलाल वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील निवडणूक रंगतदार झाली आहे.