UP Election 2022: स्मशानाचा राजा म्हणतो, ‘मोदीजी ने दी हमे पहचान’; चितांना अग्नी देणाऱ्यांना ‘पद्मश्री’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:22 AM2022-03-04T06:22:45+5:302022-03-04T06:23:36+5:30
UP Election 2022: ‘मोदीजी ने हमे पहचान दी. पद्मश्री दे के हमारे समाज को सम्मान दिया...’
सुधीर लंके, लोकमत न्यूज नेटवर्क
वाराणसी : ‘मोदीजी ने हमे पहचान दी. पद्मश्री दे के हमारे समाज को सम्मान दिया...’ काशीतील स्मशानघाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मणिकर्णिका घाटावरील डोम राजाचे वंशज ‘लोकमत’ला सांगत होते. हा समाज काशीनगरीत मृतदेहांच्या चिता रचून अंत्यदाह करण्याचे काम करतो. मोदी विधानसभा प्रचारात या समाजाचा आवर्जून उल्लेख करून, आपण शेवटच्या घटकांचीही काळजी घेतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पूर्वांचलमधील अखेरच्या टप्प्याच्या प्रचारासाठी मोदींनी २७ फेब्रुवारीला वाराणसीत कार्यकर्त्यांचे ‘बूथ विजय संमेलन’ घेतले. या संमेलनात बोलताना त्यांनी काशीत मृतांना अग्नी देणारे दिवंगत डोम राजा जगदीश चौधरी यांची आठवण काढली. त्यांची उणीव भासत असल्याचे ते म्हणाले. चौधरी यांचे २०२० साली निधन झाले. त्यानंतर मोदी सरकारने २०२१ मध्ये त्यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ देऊन गौरविले.
काशी ही मोक्षप्राप्तीची नगरी म्हणून ओळखली जाते. येथे मृत्यू येणे किंवा येथे अंत्यसंस्कार होणे हे हिंदू धर्मात भाग्याचे मानले जाते. त्यामुळे येथील मणिकर्णिका व हरिश्चंद्रघाट या स्मशानघाटांना पुराणांपासून मोठे महत्त्व आहे. अंत्यसंस्कारांसाठी येथे देशभरातून मृतदेह येतात. डोम समाज येथे चितांना अग्नी देण्याचे काम करतो. त्यांतील चौधरी परिवाराला ‘राजा’चा दर्जा आहे. ते स्मशानाचे राजा मानले जातात. घाटावरील एका मंदिरात हे डोम राजे बसतात.
स्मशानघाटावरही दलाल
अंत्यसंस्कारांपोटी पाच हजार घेऊन त्यात सर्व व्यवस्था पाहणारे दलालही येथे आहेत. सालू नावाचे एक दलाल भेटले. दुसरे काही काम मिळाले नाही म्हणून आपण अंत्यसंस्कार करून देण्याचे काम करतो, असे ते म्हणाले. त्यांच्या मते यावेळी उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीची हवा आहे. या घाटावर पंडित, मुंडण करणारे, लाकूड व पूजासाहित्य विकणारे व्यावसायिक अवलंबून आहेत.
डोम राजांना का दिली ‘पद्मश्री’?
- आपण शेवटच्या घटकाच्या विकासाचे राजकारण करतो, असे मोदी सांगतात. तो संदेश देण्यासाठीच डोम राजा दिवंगत जगदीश चौधरी यांना मोदी सरकारने पद्मश्री दिली, असे मत येथील स्थानिक पत्रकार अंबरीश सिंग यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
- येथे डोम समाजाला पंडितांएवढेच महत्त्व आहे. हे धार्मिक कारणही यामागे आहे. त्यामुळेही मोदी या समाजाचा वारंवार उल्लेख करतात. डोम राजा चौधरी हे २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा अर्ज भरताना त्यांचे अनुमोदकच होते.