UP Election 2022: उत्तर प्रदेशात डिफेन्स कॉरिडॉरची उभारणी; पंतप्रधान मोदींनी मांडला सुरक्षेचा मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 07:31 AM2022-02-28T07:31:34+5:302022-02-28T07:33:01+5:30
UP Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपीतील प्रचारसभांमध्ये कोरोना, संरक्षण आणि युक्रेनच्या मुद्द्यावर भाष्य केले.
रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क
बस्ती/देवरिया : देशात घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांनी संरक्षण उद्योग बरबाद केले, आम्ही मोठे डिफेन्स कॉरिडॉर उभारत आहोत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रचार सभांमध्ये कोरोना, संरक्षण आणि युक्रेनच्या मुद्द्यावर भाष्य केले.
सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात दहा जिल्ह्यांत ३ मार्चला ५७ मतदारसंघात मतदान होणार आहे. बस्ती आणि देवरिया जिल्ह्यातील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोरोना महामारीचा सर्वांनी सामना केला. जग संकटात होते. आम्ही प्रत्येकाला मोफत लस दिली. युक्रेनच्या परिस्थितीवर नजर आहे. प्रत्येक भारतीयाला सुखरूप देशात आणले जात असून ऑपरेशन गंगा सुरू आहे. अशावेळी जात धर्म सोडून देशहित आणि आत्मनिर्भर भारतासाठी कटिबद्ध होण्याची वेळ आहे.
ज्यावेळी आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, त्यावेळी भारतीय सूर्यवीरांनी त्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. हे सांगत एअर स्ट्राइकला ३ वर्षे पूर्ण झाल्याची आठवण मोदींनी केली. घराणेशाहीवर टीका करताना ते म्हणाले, परिवार भक्ती आणि राष्ट्रभक्तीत फरक आहे. जनता ते ओळखते. आत्मनिर्भर अभियान प्रत्येक नागरिकांचे आहे. मागील सरकारांनी विदेशातून खरेदी केली. त्यांची नजर कमिशनवर होती, असा आरोपही मोदींनी केला. भाजपाने विकासात भेदभाव केला नाही.
मोदी काय म्हणाले...
प्रत्येक नागरिकाला सुखरूप आणणार... उत्तर प्रदेशमध्ये परिवार भक्त विरुद्ध राष्ट्रभक्तांची लढाई... घराणेशाहीत देशाचा संरक्षण उद्योग बरबाद... भारतीय सूर्यवीरांनी शत्रूंना घरात घुसून मारले...
भाड्याचे घर शोधावे लागेल
- देवरियाच्या सभेत पंतप्रधान मोदींनी भावनिक आवाहन केले, आम्ही गरिबी पाहिली आहे. घरात वीज नसताना रात्र-रात्र दिव्यावर अभ्यास केला. ना पक्के घर, ना बँक बॅलन्स होते.
- माझ्या आणि विरोधकांच्या संपत्तीची तुलना करून बघा. तुम्ही मला प्रधानसेवक केले आहे, म्हणून मी फिरत आहे. उद्या वीस-पंचेवीस वर्षांनी शरीर थकेल तेव्हा मला राहण्यासाठी भाड्याचे घर शोधावे लागेल.