UP Election 2022 : मतदारांना दारू अन् पैसै वाटताना भाजप मंडल अध्यक्षांसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 05:34 PM2022-03-07T17:34:15+5:302022-03-07T17:35:33+5:30
मतदारांना आमिष दाखवून दारु आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी मिळाली होती.
गाजीपूर - उत्तर प्रदेशात मतदानाचा शेवटचा टप्पा आज पूर्णत्वाला येत असून 10 मार्च रोजी देशातील 5 राज्यात पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. मात्र, या 5 राज्यांच्या मतदान आणि प्रचार यंत्रणांकडे पाहिल्या अनेक ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसून येते. आजच्या मतदानापूर्वीच जमानिया तालुका परिसरात शनिवारी रात्री भाजप मंडल अध्यक्षांसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दारू आणि पैसे वाटप करताना पोलिसांनी या तिघांना अटके केली.
मतदारांना आमिष दाखवून दारु आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, पोलिसांना 4 पेटी देशी दारू आणि 60 हजार रुपयांची रोकड आढळली. त्यावेळी, भाजप नेत्यासह निवडणूक चिन्ह आणि एक कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पोलिसांची टीम संबंधित परिसरात पेट्रोलिंग करत होती. त्याचदरम्यान, पोलिसांना संबंधित पक्षातील स्थानिक नेत्यांकडून मतदारांना पैसे आणि दारुचे वाटप केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी रात्री उशिरा बुद्धीपूर कसब्यातील जमानिया शाह यांच्या विहिरीजवळ जमानिया भाजप मंडलचे अध्यक्ष अनिल गुप्ता यांच्यासह तिघांना ताब्यात घेतलं.
बुद्धीपूर गावनिवासी नितेश निगम आणि धनौता गांवच्या रोहित कुमारला आदर्श आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी यांच्याकडून 4 पेटी बंद आणि 1 पेटी खुली देशी दारू हस्तगत केली. तसेच, 60 ते 70 हजार रुपयांची रोकडही जप्त केली. दरम्यान, भाजप मंडल अध्यक्षांसह 3 जणांना दंड करण्यात आल्याची माहिती प्रदेशाचे कोतवाल संपूर्णानंद राय यांनी दिली.