UP Election 2022: २४ वर्षांच्या लोकगायिकेला युपी सरकार का घाबरले? वाचा, नेहा राठोड यांची विशेष मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 07:59 AM2022-03-03T07:59:18+5:302022-03-03T07:59:47+5:30
UP Election 2022: 'यूपी मे का बा?' या भोजपुरी गाण्याने उत्तर प्रदेशातील निवडणुकीत धूम माजवली आहे.
सुधीर लंके/धनाजी कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क
वाराणसी : उत्तर प्रदेश सरकार म्हणते आम्ही खूप बदल केला. मला तर या प्रदेशात बेरोजगारी, धर्मातील भांडणे, गंगेतील तरंगणारी प्रेतं, अत्याचार हे सगळेच दिसते. त्यामुळेच आपण 'यूपी मे का बा' या भोजपुरी भाषेतील गाण्यात हे प्रश्न येथील सरकारला विचारले, असे नेहा सिंह राठोड यांनी 'लोकमत' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
'यूपी मे का बा?' या भोजपुरी गाण्याने येथील निवडणुकीत धूम माजवली आहे. हे गाणे नेहा राठोड या चोवीस वर्षाच्या तरुणीने लिहिले आहे आणि एक साधा ढोलक वाजवत गायले आहे. त्या बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील असून, विज्ञानाच्या पदवीधर आहेत. मात्र, सोशल मीडियावर लाखो लोक त्यांचे गाणे ऐकूण त्यावर व्यक्त होत आहेत. सरकारसाठी हे गाणे मोठे डोकेदुखी ठरले. विरोधकांच्या प्रचाराची जणू ही टॅगलाईनच बनली. नेहा सध्या वाराणसीत आहेत. त्यांच्याशी लोकमतने साधलेला संवाद
युपी मे का बा? हे गाणे का लिहावेसे वाटले?
२०२० मध्ये झालेल्या बिहार निवडणुकीत मी ' बिहार मे का बां ?' हे भोजपुरी भाषेतील गाणे लिहिले होते. या गाण्यात मी प्रश्न विचारला आहे की 'बिहारमध्ये काय आहे? '. त्यावर बिहार सरकारने 'बिहार मे ई बा' म्हणजे 'बिहारमध्ये हे आहे' असे उत्तर दिले. बिहार व उत्तर प्रदेशात भोजपुरी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. हा प्रश्न मी उत्तर प्रदेश निवडणुकीतही विचारेल ही कदाचित भाजपला भिती होती. म्हणून भोजपुरी अभिनेता, भाजप खासदार रवी किशन यांनी उत्तर प्रदेशात निवडणूकीच्या आधी स्वतःहूनच 'यूपी मे सब बा' हे गाणे गायले. मी खरं तर उत्तर प्रदेशात असे गाणे म्हणणार नव्हते. कदाचित दुसरे गाणे लिहिले असते. पण, रवी किशन यांनी उत्तर प्रदेशात सर्वच छान छान आहे असे म्हटल्याने मला येथेही हा प्रश्न विचारावा वाटला.
योगी सरकारला तुमच्या गाण्याची धास्ती वाटली म्हणून त्यांनी रविकिशन यांना गायला लावले? ते भाजप सरकरचाच भाग आहेत. याचा अर्थ तोच होतो. नाहीतर त्यांनी माझ्या गाण्याचा संदर्भ घेतला नसता.