UP Election 2022: कसे करायचे मतदान! कोणीतरी ईव्हीएममध्ये टाकले फेविक्विक; सपाला बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 01:57 PM2022-02-23T13:57:36+5:302022-02-23T13:58:03+5:30
UP Election 2022: मतदारांनी सांगितले की सकाळपासून रांगेत उभे होतो, जेव्हा आम्ही जवळ गेलो तेव्हा आम्हाला ईव्हीएममध्ये फेविक्विक लावण्यात आल्याचे सांगितले गेले. त्यानंतर आम्ही दोन तास इथेच थांबून आहोत.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत पक्षांचे कार्यकर्ते आता कोणत्याही पातळीला उतरू लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. लखीमपूर खीरीच्या शहर विभानसभा मतदारसंघात ईव्हीएमशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मतदारांना सपाला मतदानच करता येत नव्हते. एका मतदाराच्या हे लक्षात आल्याने सारा प्रकार उघड झाला आहे.
लखीमपूर शहरातील मतदान केंद्र कादीपूर सानी येथे हा प्रकार घडला आहे. ईव्हीएमवरील सपाच्या उमेदवारा समोरील बटनामध्ये कोणत्यातरी मतदाराने फेविक्विक टाकले होते. यामुळे हे बटनच दाबले जात नव्हते. हा प्रकार समोर आल्यावर मोठी खळबळ उडाली. यामुळे जवळपास दीड तास मतदान बाधित झाले होते.
माजी आमदार आणि सपाचे उमेदवार उत्कर्ष वर्मा यांनी सांगितले की, कोणीतरी खोडसाळ व्यक्तीने पहिल्या नंबरला असलेल्या सपाच्या बटनावर फेविक्विक टाकले. या कारणाने बटन दाबले जात नव्हते. आम्ही याची लगेचच तक्रार केली, यानंतर निवडणूक आयोगाने दखल घेतली.
उत्कर्ष वर्मा यांनी आरोपीविरोधात कारवाईची मागणीकेली आहे. सीसीटीव्हीमध्ये त्याचा फोटो नक्कीच आला असेल. तर मतदारांनी सांगितले की सकाळपासून रांगेत उभे होतो, जेव्हा आम्ही जवळ गेलो तेव्हा आम्हाला ईव्हीएममध्ये फेविक्विक लावण्यात आल्याचे सांगितले गेले. त्यानंतर आम्ही दोन तास इथेच थांबून आहोत.