UP Election: PM मोदींच्या व्हर्च्युअल रॅलीला सुरुवात, एकाचवेळी 21 मतदारसंघाशी साधणार संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:29 AM2022-01-31T10:29:33+5:302022-01-31T10:29:38+5:30
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून 500-500 च्या संख्येत एकूण 49 हजार लोक जन चौपाल रॅलीचे थेट प्रक्षेपण पाहतील.
नवी दिल्ली: पुढील महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election) पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. कोरोना संसर्गामुळे प्रत्यक्ष रॅली आणि सभांवर बंदी असल्यामुळे सर्व पक्ष डिजीटल माध्यमांची मदत घेत आहेत. यातच आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली व्हर्च्युअल रॅली 'जन चौपाल' आज(सोमवार) होणार आहे.
रविवारी आजच्या रॅलीसंबंधी सर्व तयारी करण्यात आली आहे. भाजप नेते सुनील बन्सल यांनी मेळाव्याच्या प्रसारणासाठी राज्य मुख्यालयात बांधण्यात आलेल्या व्हर्च्युअल रॅली स्टुडिओची पाहणी केली. पश्चिम उत्तर प्रदेशातील 5 जिल्ह्यांतील 21 विधानसभांच्या 98 मंडळांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात 49,000 लोक थेट सहभागी होतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आग्रा आणि उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा लखनौमधील राज्य कार्यालयात बांधलेल्या व्हर्च्युअल रॅली स्टुडिओमधून रॅलीमध्ये सामील होतील.
'जनचौपाल रॅली'बाबत माहिती देताना राज्य सरचिटणीस आणि व्हर्च्युअल रॅलीचे प्रभारी अनूप गुप्ता म्हणाले की, सोमवारी होणाऱ्या रॅलीमध्ये सहारनपूरच्या नकुड, बेहाट, सहारनपूर नगर, सहारनपूर देहाट, देवबंद, गंगोह आणि रामपूर या सर्व ठिकाणी मोठ्या पडद्यावर कार्यक्रम दाखवला जाईल. याशिवाय शामलीच्या कैराना, ठाणे भवन आणि शामलीमध्ये व्हर्च्युअल रॅलीच्या प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जनचौपाल रॅलीचे प्रक्षेपण मुझफ्फरनगरच्या बुढाणा, पुरकाजी, चारथावळ, मुझफ्फरनगर, खतौली आणि मीरापूरमध्ये पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बागपत जिल्ह्यात छपरौली, बरौत आणि बागपत विभागात प्रसारण पाहण्यासाठी मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर गौतम बुद्ध नगरच्या दादरी, जेवर येथे कार्यक्रमाचे प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही कोणत्याही एका ठिकाणी रॅलीत सामील होतील.
मोबाईलवरही लिंक पाठवली जाईल
या पाच जिल्ह्यांतील 98 मंडळांमध्ये मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे प्रसारण केले जाणार आहे. या ठिकाणी कोरोना गाईडलाईनवर आधारित, सोशल डिस्टन्सिंगसह एकूण 500-500 च्या संख्येत एकूण 49 हजार लोक जन चौपाल रॅलीचे थेट प्रक्षेपण पाहतील. याशिवाय जनचौपाल रॅलीची लिंक ज्या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम होणार आहेत, तेथील स्मार्टफोनधारकांनाही पाठवण्यात येत आहे. याशिवाय राज्यभरातील कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध माध्यमातून पंतप्रधानांचे म्हणणे ऐकता येणार आहे.