UP Election Result : अखिलेश यादव हरले नाहीत, त्यांना हरवलं गेलं; मोदींना यशस्वी टक्कर देणाऱ्या मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:06 PM2022-03-11T19:06:37+5:302022-03-11T19:07:00+5:30
ममता म्हणाल्या, हा लोकप्रिय जनादेश नाही, हा यंत्रणांचा जनादेश आहे. केंद्रीय एजन्सींचा वापर करून आणि हुकूमशाहीच्या माध्यमाने त्यांनी काही राज्ये जिंकली आहेत. ते आता आनंदात विचार करत असतील, की...
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच हाती आले आहेत. भाजपने यूपीसह चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. येथे मतमोजणीपूर्वी अखिलेश यादव यांनी ईव्हीएमसोबत छेडछाडीचा आरोप केला होता. यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपविरोधात आघाडी उघडली आहे.
ममता म्हणाल्या, हा लोकप्रिय जनादेश नाही, हा यंत्रणांचा जनादेश आहे. केंद्रीय एजन्सींचा वापर करून आणि हुकूमशाहीच्या माध्यमाने त्यांनी काही राज्ये जिंकली आहेत. ते आता आनंदात विचार करत असतील, की 2024 ही जिंकू! मात्र ते एवढे सोपे नसेल. त्या इंडिया टुडेशी बोलत होत्या.
पंतप्रधान मोदी यांनी काल जनतेला संबोधित करताना 2024 मधील लोकसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या भाष्यावर आज ममता म्हणाल्या, कोण भविष्यवाणी करू शकतं, की दोन वर्षांनंतर काय होईल? नियतीच नियती आहे. नियती आणि लक्ष्य या अंतर आहे.
अखिलेश यांना हरवलं गेलं -
ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला वाटते, अखिलेश यादव यांचा ठरवून पराभव केला गेला. त्याने आव्हान द्यायला हवे. ईव्हीएमची फॉरेन्सिक तपासणी व्हायला हवी. ममता बॅनर्जी यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला समर्थन दिले होते. त्या प्रचारासाठी वाराणसीत एका रॅलीतही सहभागी झाल्या होत्या.