UP Election Results: युपीत औवेसींच्या AIMIM ची वाताहत, M-Y फॅक्टरपुढे टिकली नाही पत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 09:38 PM2022-03-10T21:38:36+5:302022-03-10T21:43:19+5:30
निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढविण्याचा आणि विजयी होण्याचा निर्धार असदुद्दीन औवेसींनी बोलून दाखवला होता.
लखनौ - उत्तर प्रदेशच्या 403 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमताल गवसणी घातली आहे. यासह भाजपने 5 राज्यांच्या निवडणुकीत 4 राज्यात सत्ता मिळवण्यात यश मिळवल्याने भाजप कार्यकर्त्यांसह नेत्यांचाही उत्साह वाढला आहे. गल्लीतील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत या विजयावर आनंद व्यक्त होत असून भाजपचा जल्लोष सुरू आहे. युपीत समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसची चांगलीच पिछेहट झाली आहे. तर, असदुद्दीन औवेसींच्या एमआयएमलाही खातं उघडता आलं नाही. त्यामुळे, मोदी-योगी फॅक्टरपुढे त्यांची चांगली वाताहत झाल्याचं दिसून आलं.
निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढविण्याचा आणि विजयी होण्याचा निर्धार असदुद्दीन औवेसींनी बोलून दाखवला होता. औवेसींनी येथील मुस्लीम जनतेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, नवीन पक्षाला येथील जनतेनं स्विकारलं नाही. भाजप आणि समाजवादी पक्षालाच जनतेचा कौल मिळाल्याचं दिसून आलं. त्यात, भाजपने विजयश्री मिळवली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एआयएमआयएम पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. युपीच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमला 0.48 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिसून येत आहे. याबाबत बोलताना असदुद्दीन औवेसी यांनी पराभव स्विकार केला. जो निकाल आहे, त्याचा आम्ही आदर करतो. यापुढे अधिक मेहनतीने आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरू आम्ही यापुढे गुजरात आणि राजस्थानमध्येही निवडणुका लढणार आहोत. उत्तर प्रदेशच्या जनतेनं आम्हाला मतदान केलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो, असे औवेसी यांनी म्हटले. तसेच, समाजवादी पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाही, हे मी आधीच सांगितले होते. आता, युपीतील जनतेला समजेल, असा टोलाही त्यांनी समाजवादी पक्षाला लगावला.