UP Election: यूपीत महिलांची ऐतिहासिक कामगिरी, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिंकल्या सर्वाधिक महिला आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:49 PM2022-03-14T18:49:43+5:302022-03-14T18:50:10+5:30
यापूर्वी 2017 मध्ये सर्वाधिक 41 महिलांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.
कानपूर: नुकताच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत अनेक नवीन रेकॉर्ड स्थापित झाले आहेत. यातच महिलांनी केलेल्या विक्रमाची चांगलीच चर्चा होत आहे. उत्तर प्रदेशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 403 पैकी 47 जागांवर महिलाआमदार निवडून आल्या आहेत.
403 जागांच्या तुलनेत 47 खुपच कमी आहेत, पण आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. राज्यात लोकसंख्येच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष जवळपास समान आहेत. मतदानाच्या बाबतीत महिलाही पुरुषांच्या बरोबरीने आहेत. पण आमदार किंवा मोठ्या पदाची वेळ आली की, ही संख्या तुलनेत खूप कमी होते.
यापूर्वी 2017 मध्ये सर्वाधिक 41 महिलांनी बाजी मारली होती. नंतर वेगवेगळ्या प्रदेशांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत आणखी तीन महिलांनी बाजी मारली. अशा प्रकारे सध्या यूपी विधानसभेत 44 महिला सदस्य आहेत. आता ती संख्या वाढून 47 झाली आहे.
560 महिलांनी निवडणूक लढवली होती
यावेळी 560 महिला उमेदवारांनी यूपी निवडणूक लढवली होती. त्यापैकी 47 जिंकल्या. भाजपच्या सर्वाधिक 29 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. समाजवादी पक्षाच्या 14 महिला उमेदवार आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. काँग्रेसने यावेळी सर्वाधिक महिलांना तिकीट दिले होते, मात्र त्यांना एकच जागा जिंकली. याशिवाय अपना दल (सोनेलाल) च्या तीन महिला उमेदवार आमदार म्हणून निवडून आल्या.