UP Exit Poll 2022: उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव होणार, तर सपाला स्पष्ट बहुमत मिळणार, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:39 IST2022-03-08T17:38:31+5:302022-03-08T17:39:37+5:30
UP Exit Poll 2022: सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र एका एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव होऊन समाजवादी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

UP Exit Poll 2022: उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव होणार, तर सपाला स्पष्ट बहुमत मिळणार, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज
नवी दिल्ली - लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. त्यातच यावेळची उत्तर प्रदेशातील निवडणूक चुरशीची होऊन सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षामध्ये थेट लढत झाल्याने उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्यातच काल सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र एका एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव होऊन समाजवादी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
देशबंधू नावाच्या संकेतस्थळाने इतर सर्व एक्झिट पोलच्या विरुद्ध असा अंदाज वर्तवताना उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव होईल, असा धक्कादायक दावा केला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा १५० जागांचा आत राहण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्ष बहुमताचा आकडा सहजपणे गाठणार आहे.
देशबंधूच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला १३४ ते १५० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला २२८ ते २४४ जागा मिळण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षाला १० ते २४ तर काँग्रेसला १ ते ९ जागा मिळू शकतात. तर इतरांच्या खात्यामध्ये ० ते ६ जागा जाण्याची शक्यता आहे. इतर एक्झिट पोलमध्ये जागांचा आकडा वेगवेगळा असला तरी त्यामधून भाजपाला बहुमत मिळेल असा समान कल दिसत आहे. मात्र देशबंधूची आकडेवारी ही इतर एक्झिट पोलपेक्षा पूर्णपणे विरुद्ध आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ हिंदीने प्रसारित केले आहे.
दरम्यान, काल प्रसिद्ध झालेल्या बहुतांश एक्झिट पोल्समध्ये उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यातील आकड्यांमध्ये भाजपाला किमान २०० ते कमाल ३२६ पर्यंत जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. तर या सर्व एक्झिट पोल्सची सरासरी असलेल्या पोल ऑफ पोल्सनुसार उत्तर प्रदेशात भाजपाला २५१ जागा मिळण्याची शक्यता आहे.