योगी सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना भेट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 07:11 PM2022-07-22T19:11:08+5:302022-07-22T19:12:09+5:30
dearness allowance : राज्य सरकारने १ जानेवारी २०२२ पासून महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा दर ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे. योगी सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने १ जानेवारी २०२२ पासून महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा दर ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
योगी सरकारच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशातील राज्य कर्मचाऱ्यांना ऑगस्टपासून तीन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता रोखीने दिला जाणार आहे. अर्थ विभागाने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव दराने डीए आणि डीआर देण्याच्या मंजुरीसाठी अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे फाइल पाठवली होती.
सरकारी कर्मचार्यांचा डीए आणि पेन्शनधारकांच्या डीआरमधील वाढ जानेवारी आणि जुलै महिन्यांपासून प्रभावी होणार आहे. मार्चमध्ये केंद्र सरकारने १ जानेवारी २०२२ पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३१ ऐवजी ३४ टक्के दराने डीए आणि डीआर देण्याचा निर्णय घेतला होता. आता यूपी सरकारच्या निर्णयानंतर राज्य कर्मचार्यांचा डीए आणि डीआरही ३४ टक्के झाला आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीव दराने डीए आणि डीआर दिल्यास राज्य सरकारवर दरमहा 220 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.