"टाळ्या-थाळ्या वाजवून कोरोना पळू शकतो तर महागाई का नाही?"; सपा आमदाराचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:02 AM2022-04-04T09:02:41+5:302022-04-04T09:13:08+5:30
Amitabh Bajpai : समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ बाजपेई यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवून एक अनोखं आंदोलन केलं आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनदरात (Petrol Diesel Price Today) वाढ होताना पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असताना भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) केलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच आहे. याच दरम्यान अनेकांनी नाराजी व्यक्त करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ बाजपेई (Amitabh Bajpai) यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवून एक अनोखं आंदोलन केलं आहे.
"टाळ्या-थाळ्या वाजवून कोरोना पळू शकतो तर महागाई का नाही?" असं म्हणत सपा आमदाराने खोचक टोला लगावला आहे. आमदाराने आपल्या काही कार्यकर्त्यांसह कानपूरमध्ये हटके अंदाजात इंधन दरवाढीचा विरोध केला आहे. आमदाराने पोस्टर्स लावले होते. तसेच थाळ्या वाजवून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीकास्त्र सोडलं आहे. थाळ्या वाजवून कोरोनासारखा गंभीर आजार जर पळून जाऊ शकतो. तर महागाई का नाही? असा संतप्त सवाल विचारला आहे.
"सातत्याने महागाई वाढत आहे. ज्या जनतेने भाजपा सरकार स्थापन केले त्यांना महागाईचा फटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव देखील वाढत आहेत. CNG ही महाग झाला आहे. टाळ्या वाजवून मोठमोठ्या समस्या दूर होतात असं आम्ही ऐकलं आहे" असं म्हणत सपा आमदाराने जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच कोरोना कमी झाला. म्हणूनच आम्ही थाळी वाजवून आता सरकारला जागं करायचं काम करत आहोत असं देखील अमिताभ बाजपेई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इंधनदरवाढीवरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेलची होत असलेली दरवाढ पाहता, पुढील निवडणुकीपर्यंत इंधनाचे दर लीटरमागे 275 रुपयांवर पोहोचतील, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. निवडणुकीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 137 दिवस स्थिर ठेवण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.